Published On : Sat, Aug 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात ध्वजारोहण

Advertisement

नागपूर, १५ ऑगस्ट २०२६: स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी नागपूर महानगरपालिका (NMC) मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यानंतर महापौरांनी मनपा अग्निशमन व आपत्कालीन सेवा दलाच्या संचलनाची पाहणी केली आणि जवानांची मानवंदना स्वीकारली.

यावेळी बोलताना महापौर नीता ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने नागपूर शहराचा विकास वेगाने होत असल्याचे सांगितले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विकासाचा अनुशेष आता कमी होत असून शहरातील विविध विकासकामांना गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी आणि आपल्या पूर्वजांनी मोठा त्याग व संघर्ष केला. त्यामुळे स्वातंत्र्य, लोकशाही आणि देशाची एकता मजबूत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे महापौरांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विकासाचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

मालमत्ता कर वसुलीसाठी १०० POS मशीनचे वितरण

स्वातंत्र्यदिन कार्यक्रमादरम्यान मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी कर संग्राहकांना १०० POS मशीनचे वितरण करण्यात आले.

Advertisement

या मशीनच्या माध्यमातून मालमत्ताधारकांना डिमांड नोटीस देताना त्याच ठिकाणी डिजिटल पद्धतीने मालमत्ता कर भरता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार मनपा कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.

अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की, या सुविधेमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर करदात्यांना मोठा फायदा होणार असून कर भरण्याची प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि सोयीस्कर होईल.

ही संकल्पना स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी मांडली होती. त्यानुसार मनपाच्या मालमत्ता कर विभागाने १०० POS मशीन खरेदी केल्या आहेत.

संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे गायन

स्वातंत्र्यदिन समारंभात संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले. गीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गीतातील सर्व कडव्यांचे गायन करण्यात आले.

कार्यक्रमाला उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते नरेंद्र ‘बाल्या’ बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्तांसह अनेक नगरसेवक, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी आणि शुभांगी पोहरे यांनी केले. आभार प्रदर्शन मनीष सोनी यांनी केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.