नागपूर : दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासोबतच त्यांची गतिशीलता वाढवून त्यांना सन्मानाने समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि समाजकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने मोफत जयपूर फूट तसेच विविध सहाय्यक उपकरणांचे मोजमाप, नोंदणी आणि वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांसाठी हे शिबिर ७ ते १० ऑगस्टदरम्यान रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयवांसह विविध प्रकारची सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जात आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नीता ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत या शिबिराची माहिती दिली. दिव्यांग लाभार्थ्यांना शिबिराच्या ठिकाणी येणे तसेच शिबिरानंतर घरी परतणे सुलभ व्हावे, यासाठी मनपाच्या परिवहन विभागामार्फत प्रभागनिहाय बसची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे गरजू दिव्यांग नागरिकांना आवश्यक कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साधने मोफत मिळणार असून, त्यांच्या स्वावलंबनाला आणि दैनंदिन जीवनातील गतिशीलतेला मोठी मदत होणार आहे.





