नागपूर : शेतीला पूरक अशा पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची कामात चांगली प्रगती आहे. शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांच्या जीवनात संशोधनाच्या माध्यमातून अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, तज्ञ, प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थी आणि संशोधकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. ते आदिवासी मुलींच्या वसतीगृहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी महापौर नंदा जिचकार, डॉ. खासदार विकास महात्मे, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. आदित्य कुमार मिश्रा, रजिस्ट्रार डी. बी. राऊत, कार्यकारी परिषदेचे डॉ. सटाले, अभियंता व्ही. सी. वैद्य याप्रसंगी उपस्थित होते.
पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते आज बाबू जगजीवनराम छात्रावास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन तसेच मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारत आणि कुलगुरुंचे निवासस्थान तथा निवासीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन यावेळी झाले.
सद्यस्थितीत विद्यापीठ उत्तमपणे काम करत आहे. राजे यशवंतराव होळकर शेळी-मेंढीपालन ही महत्त्वपूर्ण योजना असून, या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात अनुदान जमा होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या जीवनात खूप मोठा आर्थिक बदल होत आहे. या लाभार्थ्यांचे जीवनमान ऊंचावण्यासाठी आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी-मेंढीपालन, तलावयुक्त मासोळी आणि चारायुक्त शिवारच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या रोखण्याचे शासन पूर्ण प्रयत्न करत असल्याचे यावेळी पदुम मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.
विद्यापीठातील शास्त्रज्ञ, तज्ञ, प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थी आणि संशोधक हे बौद्धिक संपदायुक्त आहेत. त्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी याकडे लक्ष देण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यापीठाची थिंक टँक असणाऱ्यांनी उत्तमपणे संशोधन करावे. त्यामुळे विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलवून जागतिक दर्जाचे बनवता येईल. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण सहकार्य असल्याचे सांगून निधीची कमतरता भासणार नाही. विद्यापीठातील पदवीधर हे शेतीशी संबंधित असल्यामुळे राज्याच्या शेतकरी आत्महत्येसारखे दुष्टचक्रातून बाहेर पडण्यास मदत होतील. त्यासाठी पदभरतीही करण्यात येत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास विभागाला विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी मिळाला आहे. आता राज्यातील शेतकरी, शेतमजूर तसेच शेतीशी संबंधित कामे करणाऱ्या व्यक्ती व सहकारी संस्था पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि तलाव तेथे मासोळीच्या माध्यमातून स्वावलंबी बनत आहेत, ही महत्त्वाची बाब असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मुलींच्या वसतीगृहाचे उदघाटन केल्यानंतर पदुम मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले की, या क्षेत्रात मुली पूर्वी जास्त येत नसत. मात्र आता मुलींचा कल वाढला असल्यामुळे या वसतीगृहामुळे त्यांच्या राहण्याची सोय ही झाली आहे. या वसतीगृहामुळे मुलींच्या आरोग्य आणि संरक्षणाचाही प्रश्न मिटला असून, जास्तीत जास्त मुलींनी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात प्रवेश घ्यावेत. गरज पडल्यास पुन्हा दुसरे वसतीगृह बांधले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण संस्थेची उभारणी करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
तत्पूर्वी खासदार विकास महात्मे यांनी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात होत असलेला बदल लक्षणीय असल्याचे सांगून मुलीही मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत असल्याचे सांगितले. राज्य शासनाच्या राजे यशवंतराव होळकर मेषपालन, कुक्कुट पालन योजनेचा महिलांनी लाभ घेतल्यास निश्चितच आर्थिक स्थिती सुधारेल, असे सांगितले. तर महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी महिलांच्या सर्वच क्षेत्रातील सहभागाबाबत समाधान व्यक्त करुन पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने मुलींना अत्याधुनिक वसतीगृह उपलब्ध करुन दिल्याबद्दल अभिनंदन केले.
प्रास्ताविकात कुलगुरु प्रा. आदित्य कुमार मिश्रा यांनी विद्यापीठाच्या एकदंरीत कामकाजाबाबत माहिती दिली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. अतुल ढोक यांनी केले.













