Published On : Wed, Sep 6th, 2017

उज्‍वल भारताचे स्‍वप्‍न साकारण्‍यासाठी नागरिकाचा सहभाग महत्‍वाचा – महापौर नंदा जिचकार

नागपूर: स्‍वत:मध्‍ये परिवर्तन घडविल्‍यास, देशातही परिवर्तन घडू शकते. 2022 पर्यंत आपला देश भ्रष्‍टाचारमुक्‍त, अस्‍वच्‍छतामुक्‍त, गरीबीमुक्‍त, जातिवादमुक्‍त करण्‍यासाठी प्रत्‍येक नागरिकांनी संकल्‍प करावा. ‘संकल्‍पातून सिद्धी’ हा आपला मूळमंत्र असला पाहिजे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी आज केले.

संसदीय कार्य मंत्रालय, जाहिरात व दृश्य प्रचार संचलनालय, तसेच राईटस लिमिटेड यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सिव्हिल लाइन्स, राणी कोठी येथे आयोजित ‘नया भारत- हम करके रहेंगे’ या छायाचित्र प्रदर्शनाचे तसेच सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन महापौरांच्या हस्‍ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी खासदार डॉ. विकास महात्‍मे, जिल्‍हाधिकारी सचिन कुर्वे, संसदीय कामकाज मंत्रालयाचे अप्‍पर सचिव एस.एस.पात्रा, राईटसचे महाव्‍यवस्‍थापक दिपक शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.

देशाच्‍या तरूण पीढीमध्‍ये देशाचे भवितव्‍य आहे. थोर क्रांतीकारकांनी स्‍वातंत्र्यलढयात प्राणाचे बलिदान करून सर्व भारतीयांच्‍या हृदयात आपले स्‍थान निर्माण केले. 1942 ते 1947 या पाच वर्षाच्‍या काळात जो संघर्ष आपण केला, त्‍याचे जोमाने 2022 पर्यंत म्‍हणजे पुढील पाच वर्षात एक नवा भारत घडविण्‍याचा संकल्‍प करण्याचे आवाहन केले. यावेळी ‘संकल्‍प से सिद्धि-नए भारत का संकल्‍प’ ही शपथ त्यांनी उपस्थितांना दिली.

खासदार डॉ. विकास महात्‍मे यांनी 1942 च्‍या भारत छोडो आंदोलनामुळे भारतीयांमध्‍ये आत्‍मविश्‍वास जागृत झाला, या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, असे सांगितले. याच अनुषंगाने पुढील पाच वर्षात एका नव्‍या भारताच्‍या निर्मितीचा संकल्‍प शासनाने हाती घेतला असून अनेक लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी जोमाने होत आहे, असे त्‍यांनी यावेळी नमूद केले.

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास सादर करण्यात आला आहे. युवकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

माहिती व प्रसारणाच्या गीत आणि नाटक विभागाअंतर्गत असलेल्‍या शाहीर देवानंद माळी यांच्‍या कलापथकाने महाराष्‍ट्रगीत सादर केले.
छायाचित्र प्रदर्शन पाहण्‍याकरिता सरस्‍वती विद्यालय, शंकरनगर, नीरी मॉर्डर्न स्‍कुल, सुरेंद्रनगर येथील विद्यार्थी तसेच इतर शाळामधील विद्यार्थी, नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणूका देशकर यांनी तर आभार राईटसचे महाव्‍यवस्‍थापक दीपक शर्मा यांनी मानले.

पाच दिवस सुरु राहणार छायाचित्र प्रदर्शन
सिव्हिल लाइन्स, राणी कोठी येथे आजपासून सुरू झालेले हे छायाचित्र प्रदर्शन पुढील पाच दिवस, 10 सप्‍टेंबर पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 8 पर्यंत सर्व नागरिकांना पाहण्‍यासाठी खुले राहणार आहे. भारत छोडो आंदोलनाच्या 75 व्या वर्षापूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील ‘नया भारत- हम करके रहेंगे’ (‘न्यू इंडिया-वी रिझॉल्व्ह टू मेक’) ही या प्रदर्शनाची मुळ संकल्पना आहे.

देशभरातील 37 ठिकाणी अशा प्रदर्शनांचे आयोजन केले जात आहे. या प्रदर्शनाचा केंद्रबिंदू 1857 ते 1947 पर्यंतच्या काळात झालेली भारताची स्वातंत्र्य चळवळ आहे. “स्वातंत्र्याचे प्रथम युद्ध, 1857”, “चंपारण सत्याग्रह”, “असहकार चळवळ”,”दांडी यात्रा” आणि “भारत छोडो आंदोलन” अशा चळवळीच्या विविध महत्वपुर्ण आंदोलनाची माहिती सदर प्रदर्शनातून मिळेल. 2017 ते 2022 पर्यंत राबविण्यात येणा-या केंद्र शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांच्या माहितीच्या माध्यमातून नवीन भारताचा दृष्टीकोनही याप्रसंगी प्रदर्शित केला जाईल. याच ठिकाणी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या गीत व नाटक विभागाव्‍दारे सायंकाळी 7 ते 8 च्‍या दरम्यान महाराष्‍ट्रातील लोक कलांचे सादरीकरण व इतर सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.