Published On : Sun, Jan 19th, 2020

गडचिरोलीला अजून पुढे नेहण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयाची गरज

Advertisement

– जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या सूचना

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यामध्ये गतीने सुरु असलेली कामे सर्वांच्या सहकार्याने अजून पुढे घेवून जावू, जिल्हा अजून पुढे नेहण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयाची गरज आहे असे प्रतिपादन नुकतेच रुजु झालेले जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले महसूल, जिल्हा परिषद, वन विभाग आणि शासनाचे इतर सर्व विभाग यांनी टीम म्हणून काम केले पाहिजे. विकासात्मक कामांमध्ये महसूल विभागानेही योगदान द्यावयाचे आहे. गडचिरोली जिल्हा अजून पुढे घेवून जाण्यासाठी त्यांनी विविध विभागांना यावेळी नवनवीन कल्पना सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी यावेळी भौतिक सुविधा पुरविण्या बरोबर त्याठिकाणी आपण देत असलेल्या सेवा व सुविधा योग्य देतोय का? याबाबत तपासणी करणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

रविवारी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी टी एस तिडके, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी सर्व विभागांची माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी घेतली.

जिल्हाधिकारी यांनी विभाग प्रमुख यांचेशी संवाद साधताना विविध विषयांवर चर्चा केली. ते म्हणाले की, जिल्ह्यात विकास कामांनाच प्राधान्य दिले जाईल. जिल्हा इंटरनेट व वीज या दोन्ही सेवांनी परिपुर्ण झाला पाहिजे नाहीतर प्रशासन व लोकांची कामे कशी होतील. यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य, अंगणवाडी, दळणवळण इ. सुविधांवर विशेष चर्चा केली. प्रत्येक विभागांना सद्यास्थितीबाबत विभागनिहाय सादरीकरण करण्यासाठी आदेशही दिले. पुढील दोन आठवडयात सर्व विभागांची कामे ते समजून घेणार आहेत. जिल्हाधिकारी दीपक सिंगला म्हणाले, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या ठिकाणी खूप काम करण्याची संधी प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांना आहे. त्या संधीचे सोने करुया. नव्याने काही संकल्पना राबविण्याची गरज असल्यास आपण त्या माझ्याकडे घेवून याव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आरोग्य सुविधांबाबत विशेष चर्चा : गडचिरोली जिल्ह्यात खाजगी दवाखाने मोठया प्रमाणात नाहीत. सर्व ग्रामीण तसेच शहरी लोक शासकीय व्यवस्थेवर अवलंबून आहे. मग अशा वेळी शासकीय दवाखाने व त्यामधील सोईसुविधा उच्च दर्जाच्या असाव्यात. आपण जिल्ह्यातील आरोग्य सुविधा चांगल्या करण्यासाठी विशेष प्रयत्न करुया.

*जिल्हयात विभाग प्रमुखांनी केले स्वागत* : जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे कार्यालयात सर्व विभांकडून स्वागत करण्यात आले.