Published On : Wed, Feb 5th, 2020

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – रश्मी बर्वे

Advertisement

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

नागपूर: दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी केले.

जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवस चालणाऱ्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन करतांना श्रीमती बर्वे बोलत होत्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, समाज कल्याण समितीच्या सभापती श्रीमती नेमावली माटे, तापेश्वर वैद्य, महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती उज्ज्वला बोढारे, श्रीमती भारती पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, समाज कल्याण विभागाचे डॉ. सिध्दार्थ गायकवाड, विधी व न्याय प्राधिकरणाचे सचिव अभिजीत देशमुख तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती सुकेशिनी तेलगोटे यावेळी उपस्थित होत्या.

क्रीडा ध्वज फडकवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी खेळाडूंना शपथ देण्यात आली. अंध, मतिमंद, अस्थिव्यंग तसेच मुकबधीर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ‘मार्च पास’द्वारे मान्यवरांना सलामी दिली. यावेळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करुन संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
श्रीमती बर्वे म्हणाल्या, दिव्यांग विद्यार्थ्यांना दयेने न बघता त्यांच्या पुनर्वसनासाठी सक्रिय पुढाकार घेणे गरजेचे आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांमधील खिलाडू वृत्तीला चालना देण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी दिव्यांग क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. आजच्या दिव्यांग स्पर्धेमध्ये दीड हजाराहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत, ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. दिव्यांगामध्ये अनेक सुप्त कलागुण असतात. त्यांना वाव देणे गरजेचे आहे. त्यांच्या शिक्षणासाठी तसेच सक्षमीकरणासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. त्यांची माहिती गरजू घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. फुटाणे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, दिव्यांग बांधवांनी शारीरिक कमतरतेवर मात करुन क्रीडा कौशल्य प्राप्त केले आहे. अशा स्पर्धा सामान्य नागरिकांमध्ये देखील सकारात्मकता पेरतात. यापासून समाजाने प्रेरणा घ्यावी.

या स्पर्धा केवळ जिल्हास्तरावरच आयोजित न करता, विभागीय स्तरावर देखील व्हाव्यात. जेणेकरुन दिव्यांग क्रीडापटूंना व्यासपीठ मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करून श्री. गायकवाड म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सोयी-सुविधांनी युक्त विभागीय क्रीडा संकुलाची स्थापना व्हावी. दिव्यांग विद्यार्थी कर्मशाळेतून सुंदर कलाकृतींची निर्मिती करतात. या कलाकृतींना योग्य बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे.

प्रास्ताविकात श्रीमती तेलगोटे यांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये 206 प्रकारच्या क्रीडा प्रकारांचा समावेश असून यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षकांनी अथक प्रयत्न केले असल्याचे यावेळी सांगितले.

दिव्यांगांना नेहमीच मदत करणारे दिवंगत योगेश कुंभलकर यांचा यावेळी मरणोत्तर सन्मान करण्यात आला. त्यांच्या पत्नी श्रीमती वनिता कुंभलकर यांनी हा सन्मान स्वीकारला. जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद आणि दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, पालक यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बादल श्रीरामे यांनी तर आभार प्रल्हाद लांडे यांनी मानले.