Published On : Wed, Feb 5th, 2020

रस्ते अतिक्रमणमुक्त करा !

Advertisement

जनतेची मागणी : धंतोली झोनमधील महापौरांच्या ‘जनता दरबारात’ तक्रारींचा पाऊस

नागपूर: नागरिकांनी रहिवासी भागातील अतिक्रमणासंदर्भात आणि फुटपाथवरील अतिक्रमणासंदर्भात केलेल्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता धंतोली झोनअंतर्गत रहिवासी भागात असलेल्या अतिक्रमणासंदर्भात लवकर कार्यवाही सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

महापौर संदीप जोशी यांच्या झोननिहाय जनता दरबाराच्या मालिकेत बुधवारी (ता. ५) धंतोली झोन क्र. ४ चा जनता दरबार पार पडला. या जनता दरबारात तब्बल ११२ तक्रारींवर महापौरांनी सुनावणी केली. जनता दरबाराचे आवाहन केल्यानंतर दिलेल्या मुदतीत धंतोली झोन कार्यालयात ८९ तक्रारींची नोंदणी झाली होती. बुधवारी जनता दरबारादरम्यान २३ तक्रारी नव्याने आल्यात. संपूर्ण ११२ तक्रारकर्त्यांशी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्तिगत संवाद साधला. यावेळी महापौर संदीप जोशी यांच्यासह झोन सभापती लता काडगाये, सहायक आयुक्त स्नेहा करपे, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, भारती बुंडे, विशाखा बांते, वंदना भगत, नगरसेवक संदीप गवई, विजय चुटेले, प्रमोद चिखले, उप अभियंता सुनील गजभिये, सहायक अधीक्षक विजय थूल, प्रभारी विभागीय अधिकारी (आरोग्य) अरुण तुर्के उपस्थित होते.

जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी अतिक्रमण व मलवाहिनी यासंदर्भात होत्या. याव्यतिरिक्त विहिरीतील दूषित पाणी, स्पीड ब्रेकर्सची मागणी, मोकाट कुत्र्यांचा त्रास, अरुंद रस्ते, उद्यानांमधील असुविधा अशा विविध समस्यांही नागरिकांनी मांडल्या.

संपूर्ण शहरामध्ये सध्या अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. अतिक्रमणाच्या समस्येकडे संबंधित अधिकाऱ्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे. आवश्यक ठिकाणी मोका पाहणी करून अतिक्रमण हटविण्याबाबत सक्त कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. धंतोली झोनमधील काही परिसरांमध्ये वारंवार गडरलाईन चोक होत असल्याच्या तक्रारीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी स्वच्छता निरीक्षकासह मोका पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.
सिवर लाईनही अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. यामुळे अनेक ठिकाणी त्या डॅमेज झाल्या आहेत. यामुळे आता नवीन सिवर लाईन टाकणे, पावसाचे पाणी घरात शिरू नये म्हणून पावसाळी नालींची निर्मिती करण्यात यावी, यासह विविध मागण्याही महापौरांच्या ‘जनता दरबारा’मध्ये करण्यात आल्या. संबंधित कामांमध्ये येणारे अडथळे दूर करून येत्या ७ दिवसांमध्ये प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.

महापौर संदीप जोशी यांच्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती. प्रत्येकजण आपल्या परिसरातील समस्या सुटाव्या, या आशेने जनता दरबारात सहभागी झाले होते. प्रत्येक तक्रारकर्त्याला महापौर संदीप जोशी यांनी आश्वस्त केले. वैयक्तिक जागेवर शेजारच्याने केलेल्या अतिक्रमणामुळे वृद्ध दाम्पत्य त्रासलेले होते. तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा असून त्यांनी दाम्पत्याला मारहाण करण्यासाठी गुंड पाठविल्याची कैफियतही त्यांनी मांडली. या तक्रारीवर महापौर संदीप जोशी यांनी त्यांना दिलासा देत जर यापुढे असा काही प्रकार घडला तर आपण स्वत: उभे राहून त्याचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करु, असे आश्वस्त केले.

जनता दरबाराला संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.