Published On : Sat, Jul 6th, 2019

पर्यावरण, जलसंधारण आणि आरोग्य क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज : पालकमंत्री बावनकुळे

खापरी येथील आरोग्य शिबिर 1786 रुग्णांची झाली तपासणी

नागपूर: पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. यासाठी आपणच जबाबदार असून बिघडलेले हे संतुलन पूर्ववत करण्यासाठी पर्यावरण, जलसंधारण व आरोग्य या क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी 5 झाडे लावावी व ती जगवावी, अन्यथा 2030 पर्यंत पर्यावरणाच्या असंतुलनाचे परिणाम आपण भोगल्याशिवाय राहणार नाही, असे कळकळीचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज खापरी येथे केले.

श्री श्री फाऊंडेशनतर्फे आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनानिमित्त ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प. सदस्य रुपराव शिंगणे, रेखा मसराम, केशव सोनटक्के, श्री श्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संकेत बावनकुळे, नरेश भोयर, दिलीप खोब्रागडे, डॉ.प्रीती मानमोडे, दिलीप नंदागवळी,राजेंद्र राजूरकर, सचिन धोटे, सचिन इंगळे, मिहान एसईझेडचे आयुक्त जयकुमार सिंग, सल्लागार चहांदे आदी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले- गावातले पाणी गावातच जिरले पाहिजे यासाठी जलयुक्त शिवार उपक्रम शासनाने आणला आहे. पर्यावरण, जलसंधारणासारखे उपक्रम राबविण्यासाठी श्री श्री फाऊंडेशन सारख्या संस्थांनी पुढे यावे. आरोग्य शिबिर म्हणजे जीवन देण्याचे काम आहे. हे सर्वात मोठे काम आहे. यासोबतच पर्यावरण रक्षण आणि जलसंधारणाचे कामही व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्र्यांनी तरुण कार्यकर्त्यांनी या तीन कामांची जबाबदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

श्री श्री फाऊंडेशनचे खापरी येथील आजचे चवथे आरोग्य शिबिर होते. यापूर्वी कोराडी, मौदा, गुमथळा येथील शिबिरे प्रचंड यशस्वी झाले आहे. आतापर्यंत 8 हजार रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. आजच्या शिबिरात 1786 रुग्णांची तपासणी करण्यात आली. आवश्यक असलेल्या रुग्णांना औषधोपचारही करण्यात आले. या शिबिरात 400 रुग्णांनी डोळे तपासून घेतले. 276 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. 103 महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली. दंत चिकित्सकांनी 140 रुग्णांची तपासणी केली. 41 रुग्णांनी हृदयरोग तपासणी करून घेतली. मेंदू व अस्थीरोग तज्ञांकडून 142 रुग्णांनी तपासणी करून घेतली. काही रुग्णांच्या दातांवर शिबिरातच औषधोपचार करण्यात आला. 250 रुग्णांना चष्मा लावण्याचा सल्ला देण्यात आला.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महेश बोंडे, राजेश गोल्हर, संजय भोगाडे, विकास घारपुडे, सुनील बोरीकर, हर्षल हिंगणीकर, निलेश भुरचुंडे, अमोल मेश्राम, ताराचंद रोकडे, संजय महाकाळकर, प्रमोद डेहनकर, सुभाष म्हस्के आदींनी परिश्रम घेतले.