Published On : Sat, Jul 6th, 2019

कचरा करून दुर्गंधी पसरविणाऱ्या दुकानदारांना नोटीस द्या!

महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : गोकुळपेठ बाजाराचा केला आकस्मिक दौरा

नागपूर : गोकुळपेठ बाजार परिसरात तेथील दुकानदारांनी दुकानांसमोर टाकलेला कचरा पाहून महापौर नंदा जिचकार यांनी नाराजी व्यक्त केली. स्वत: निर्माण केलेला कचरा दुकानासमोर अथवा बाजारात टाकणाऱ्या दुकानदारांना तात्काळ नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यापुढे पुन्हा असे आढळल्यास कारवाई करण्याचेही आदेश दिले.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौर नंदा जिचकार यांनी शनिवारी (ता. ६) धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या गोकुळपेठ बाजाराचा आकस्मिक दौरा केला. यावेळी त्यांना बाजारात कचरा मोठ्या प्रमाणावर आढळून आला. पावसाचे दिवस असल्याने कचऱ्यातून दुर्गंधी येत होती. हे दृश्य पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आता बाजार स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले.

सदर दौऱ्यात महापौर नंदा जिचकार यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेविका रूपा रॉय, नगरसेवक संजय बंगाले, सुनील हिरणवार, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरीता कामदार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, झोनल अधिकारी डी.पी. टेंभेकर उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार दुपारी ४.३० वाजता गोकुळपेठ बाजारात पोहोचल्या. अनेक दुकानांसमोर त्यांना दुकानाचा कचरा पडलेला आढळला. त्या दुकानदारांना त्यांनी तंबी देत यापुढे दुकानासमोर कचरा आढल्यास नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. दुकानातील कचरा टाकण्यासाठी प्रत्येक दुकानदाराने दुकानासमोर कचरापेटी ठेवावी, असे सांगत ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करतो त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी, असे आवाहन केले.

यावेळी बाजारातील मटन मार्केट, मच्छी मार्केटचीही त्यांनी पाहणी केली. तेथील दुर्गंधीमुळेही त्यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना बजावले. बाजारातील काही जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आढळला. तो कचरा तातडीने उचलण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

गोकुळपेठ बाजारात काही गाळे मटन विक्रेत्यांसाठी बांधण्यात आले आहेत. मात्र, गाळे असतानाही गाळ्याबाहेर ते अतिक्रमण करून बसतात. यासंदर्भात बाजार विभागाने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. गाळे उपयोगात नसतील तर त्यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बाजारात मनपाची एक जीर्ण इमारत आहे. तिचाही सध्या काही उपयोग नाही. सदर इमारत पाडण्याचा प्रस्ताव तयार करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, कॉलरा, स्वाईन फ्ल्यू सारख्या साथीच्या रोगाचे प्रमाण वाढू शकते. अशा काळात आरोग्य यंत्रणा तत्पर ठेवण्याचे निर्देश आरोग्य अधिकारी डॉ. सरीता कामदार यांनी महापौरांनी दिले.

प्रत्येक झोनमध्ये करणार आकस्मिक दौरा
महापौर नंदा जिचकार ह्या पुढील काही दिवसांत प्रत्येक झोनमध्ये असलेल्या बाजारांचा आकस्मिक दौरा करणार आहेत. बाजारातील स्वच्छता, प्लास्टिकचा वापर आदींसोबतच पावसाळ्याच्या दृष्टीने प्रत्येक झोनमध्ये आपत्ती निवारण आणि अन्य तयारीसंदर्भात आढावाही त्या घेतील.

Advertisement
Advertisement