वर्धा : कुष्ठरोगाचा लवकर शोध घेणे आणि रोग्यांना उपचार पुरविणे या गोष्टींना प्राधान्य देऊन कुष्ठरोगाच्या समुळ निर्मुलनासाठी बहुआयामी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर द्यावा, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले.
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालय येथे गांधी मेमोरिअल लेप्रसी फाऊंडेशन यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठरोग सेवा पुरस्कार-2017 च्या वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार डॉ. पंकज भोयर, विभागीय आयुक्त अनुप कुमार, संस्थेचे अध्यक्ष धिरुभाई मेहता, जे.के. बांठिया, डॉ. बी.एस.गर्ग, पी.एल.तापडिया आणि पुरस्कार प्राप्त डॉ. अतुल शहा व डॉ. एम.डी. गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा गांधी , कस्तुरबा गांधी आणि सुशिला नायर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते सुतमाला अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते डॉ. एम.डी. गुप्ते व डॉ. अतुल शहा यांना कुष्ठरोग निर्मुलन कार्यातील उल्लेखनीय सेवेबद्दल आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठरोग सेवा पुरस्कार -2017 प्रदान करण्यात आला.
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी श्री.नायडू म्हणाले, मानवसेवा हीच माधव सेवा अर्थात ईश्वरसेवा असल्याची महात्मा गांधी यांची शिकवण होती. महात्मा गांधी यांचे विचार आजही सुसंगत ठरतात. ‘खेड्यांकडे चला’ असा नारा महात्मा गांधी यांनी दिला. ग्रामराज्याशिवाय रामराज्याची संकल्पना साकार होणार नाही. त्यासाठी आपल्या नियोजनाची दिशा ग्रामीण भागाकडे केंद्रित करणे गरजेचे आहे. खादी हे स्वावंलबन आणि साधेपणाचे प्रतिक आहे, अशी स्वदेशीबाबतची शिकवण देतांना महात्मा गांधी यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर खादीचे उत्पादन ‘मनरेगा’शी जोडण्याची संकल्पना अंत्यंत उपयुक्त ठरू शकते. आपल्या प्राचिन परंपराचे, संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड केली पाहिजे. उज्ज्वल भवितव्यासाठी निसर्ग आणि संस्कृतीचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचेही श्री. नायडू यांनी सांगितले.
कुष्ठरोगाबाबत महात्मा गांधी यांचे विचार मांडतांना श्री. नायडू म्हणाले, नोव्हेंबर १९४७ च्या ‘हरिजन’ साप्ताहिकात गांधीजींनी लिहिले होते, ‘‘कुष्ठरोग्यांची सेवा ही केवळ उपचारापुरती नाही तर त्यांचे पुनर्वसन करून, त्यांचे नैराश्य दूर करून जगण्याचा आनंद त्यांना घेता यावा यासाठीसुद्धा आहे. अशा रोग्याचे जीवन तुम्ही जर बदलून टाकले तर तुम्ही खेड्यातच नव्हे तर राष्ट्रात परिवर्तन घडवून आणू शकाल.’’ १९४५ मध्ये प्रो. जगदीशन यांनी कस्तुरबा कुष्ठ निलयम या कुष्ठरोग्यांच्या निवासस्थानाचे उद्घाटन करण्यासाठी महात्माजींना निमंत्रित केले असता ते म्हणाले होते,‘‘उद्घाटनासाठी तुम्ही अन्य कुणाला तरी बोलवा पण ते बंद करण्यासाठी मात्र मला बोलवा’ अशा तऱ्हेने कुष्ठरोग्यांसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था हा त्या समस्येवरचा तोडगा नाही, असेच त्यांनी सुचविले.
१९५० मध्ये स्थापन झालेल्या गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊन्डेशनने या रोगाच्या निर्मुलनासाठी चांगली कामगिरी बजावून हा एक कलंक असल्याची समाजातील कल्पना दूर केली. या फाऊन्डेशनने कुष्ठरोग्यांवर उपचार तर केलेच पण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही केले, असे गौरवोद्गार श्री. नायडू यांनी काढले. २०१२-१३ या काळात कुष्ठरोग्यांची संख्या ८३ हजार होती व त्यांचे प्रमाण १० हजार लोकसंख्येत ०.६८ टक्के इतके होते. २०१२ सालापर्यंत देशातील ६४० जिल्ह्यांपैकी ५४२ जिल्ह्यातून या रोगाचा समूळ नायनाट करण्यात यश संपादन केले असले तरीही नवी प्रकरणे पुढे येत आहेत. याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
छत्तीसगड आणि दादरा-हवेली या केंद्रशासित प्रदेशात दर दहा हजारी दोन आणि चार रोगी हे प्रमाण आजही पहावयास मिळते. ज्या बिहार, महाराष्ट्र आणि प. बंगाल या राज्यातून कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन झाले होते त्या राज्यात अलीकडच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. २०१२-१३ यावर्षी देशातील २०९ जिल्हे कुष्ठरोगाने बाधित होते, या जिल्ह्यात लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कुष्ठरोगाचा लवकर शोध घेणे आणि रोग्यांना उपचार पुरविणे या गोष्टीला आपण प्राथमिकता द्यायला हवी. रोगापेक्षा एक कलंक म्हणून रोग्याकडे बघितले जाते ही खरी चिंतेची बाब आहे. उपचारासंबधी अनभिज्ञता आणि रोगाविषयी असलेल्या भ्रामक कल्पना याचाच कुष्ठरोग्यांना अधिक त्रास होत असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले.
संपूर्ण जगात दरवर्षी अडीच लाख नवीन प्रकरणे प्रकाशात येतात. समाजात या रोगाविषयी जागरुकता निर्माण करावी लागेल. हा रोग कलंक आहे ही समजूत दूर करण्याचे प्रयत्न झाले तर रोगी स्वत:चा रोग लपवून ठेवणार नाहीत. २०२० पर्यंत या रोगामुळे व्यंग येणाऱ्यांची संख्या दहा लाखात एक व्यक्ती इतकी कमी करण्याचा संकल्प जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. हा रोग समूळ नष्ट करण्यासाठी बहुआयामी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचे आवाहनही श्री. नायडू यांनी केले.
पुरस्कार विजेते डॉ. एम.डी.गुप्ते मनोगतात म्हणाले, कुष्ठरोग निर्मुलनाच्या क्षेत्रात महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाचे योगदान मोठे आहे. कुष्ठरोग निर्मुलनाच्या क्षेत्रात आगामी काळात काम करतांना सुदुर सर्वेक्षण, उपलब्ध मनुष्यबळाचा वापर, स्थानिक संबधित संशोधनाचा वापर आणि किफायतशीर सेवा या मुद्दयांवर अधिक भर द्यावा लागेल. असेही डॉ. गुप्ते यांनी सांगितले.
डॉ. अतुल शहा म्हणाले, कुष्ठरोग व कुष्ठ रुग्णांप्रतीचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची अद्यापही नितांत आवश्यकता आहे. कुष्ठरोगावरच्या उपचारात सर्वांगीण उपचार पद्धतीवर भर देण्याची गरज असून कुष्ठरुग्णांसमवेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येऊ नये, असे आवाहनही डॉ. शहा यांनी केले.
अध्यक्ष धिरुभाई मेहता प्रास्ताविकात म्हणाले, कुष्ठरोग निर्मुलनाच्या क्षेत्रात महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालय अनेक वर्षापासुन कार्यरत असून कुष्ठरोग व कुष्ठरुग्णांबाबत समाजात असलेले अनेक गैरसमज दूर करण्याची गरज आहे. महात्मा गांधी यांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन संस्था मार्गक्रमण करीत असल्याचेही श्री. मेहता यांनी सांगितले.
जे.के. बांठिया आणि डॉ. बी.एस.गर्ग यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. पी.एल.तापडिया यांनी आभार मानले.
