Published On : Mon, Feb 26th, 2018

‘एलिफंटा परेड’ कलाप्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

मुंबई: ‘एलिफंटा फॅमिली’ आणि ‘गुड अर्थ’ यांच्या सहयोगाने आयोजित “एलिफंटा परेड” या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गेट वे ऑफ इंडिया येथे करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी, खासदार व ‘एलिफंटा परेड’च्या दूत पूनम महाजन, एलिफंटा फॅमिली या संस्थेच्या विश्वस्त रुथ गणेश उपस्थित होत्या.

प्राण्यांच्या अस्तित्वाविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी एलिफंटा परेड या कला प्रदर्शनाच्या माध्यमातून हत्तींच्या शिल्पकृती साकारून जंगल वाचवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे. ही शिल्पे अमिताभ बच्चन, एल.एन. तल्लूर, सब्यसाची मुखर्जी, मसाबा गुप्ता आदींनी साकारली आहेत.

या रंगीत हत्तींना पाहायला येणारे रसिक त्यांच्यासोबत छान फोटो काढू शकतात. यातून मानव-प्राणी नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न होणार आहे. या शिल्पकृती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून त्यातून मिळणारा निधी जंगल वाचवण्यासाठी तसेच इतर जंगली प्राण्यांच्या संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे. हे प्रदर्शन पुढील तीन आठवडे मुंबईच्या विविध भागांमध्ये फिरेल.