Published On : Tue, Dec 3rd, 2019

स्वच्छ, सुंदर नागपूरसाठी ‘एनडीएस’ला मिळणार बळकटी

लवकरच नवीन ११४ पदभरती : उपद्रव शोध पथकाच्या कार्यप्रणालीचा महापौरांनी घेतला आढावा

नागपूर : मनपाच्या स्वच्छता कर्मचा-यांकडून नियमीत स्वच्छता करूनच आपले शहर स्वच्छ, सुंदर होणार नाही. तर नागरिकांनी आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे. नागरिकांना लागलेल्या सवयी बदलविण्यासाठी, त्यांना शिस्त लावण्यासाठी मनपाचे उपद्रव शोध पथक (एनडीएस) कार्य करते. अस्वच्छता पसरवून शहर विद्रुप करणा-यांवर दंडात्मक कारवाई उपद्रव शोध पथकाद्वारे केली जाते.

त्यामुळे उपद्रवींवर काही प्रमाणात आळा बसत आहे. आपले नागपूर स्वच्छ, सुंदर व्हावे यासाठी उपद्रव शोध पथकाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र शहराची लोकसंख्या पाहता उपद्रव शोध पथकातील कर्मचा-यांची संख्या तोकडी आहे. शहराच्या भवितव्यासाठी उपद्रव शोध पथकाला अधिक बळकटी मिळणार आहे. लवकरच उपद्रव शोध पथकामध्ये नवीन ११४ पदभरती केली जाईल, अशी घोषणा महापौर संदीप जोशी यांनी केली.

उपद्रव शोध पथकातील कर्मचा-यांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्याबाबत मंगळवारी (ता.३) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, प्रतोद दिव्या धुरडे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, धंतोली झोन सभापती लता काडगाये, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, लकडगंज झोन सभापती राजकुमार साहु, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, स्वच्छ भारतचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, उपद्रव शोध पथकाचे पथक प्रमुख वीरसेन तांबे आदी उपस्थित होते.

यावेळी महापौरांनी उपद्रव शोध पथकाच्या कामगिरीचा झोननिहाय आढावा घेतला. याशिवाय पथकाद्वारे कारवाई दरम्यान येणा-या अडचणी जाणून घेतल्या. शहरातील नागरिकांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक सूचनाही त्यांनी पथकाकडून मागविल्या. नियमांचे उल्लंघन करुन शहर विद्रुप करणा-यांवर कारवाई करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आले आहे.

झोन स्तरावर पथकाची नेमणूक करण्यात आली असून पथकामध्ये ८७ जणांचा समावेश आहे. शहराची लोकसंख्या पाहता ही संख्या कमी असल्याने शहराला शिस्त लावण्यासाठी पथकाचे हात अधिक बळकट करणे आवश्यक आहे. यासाठी नवीन ११४ कर्मचा-यांची नियुक्ती केली जाणार आहे. येत्या ११ डिसेंबरला या पदभरतीसाठी मुलाखतही घेतली जाणार आहे. त्यामुळे पथकाने आता अधिक जोमाने कार्य करावे, असे महापौर संदीप जोशी म्हणाले. उपद्रव शोध पथकाद्वारे उत्तम काम करण्यात येत आहे. मात्र पथकाने आपली भूमिका ही केवळ उपद्रव पसरविणा-या नागरिकांकडून दंड वसूल करणे हिच नसून नागरिकांना शिस्त लावणे हा आपला हेतू आहे आणि त्यादृष्टीने पथकाकडून कार्य करण्यात यावे, असेही महापौर म्हणाले.

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आज नागपूरचे स्थान ५०वे आहे. मनपातर्फे स्वच्छतेबाबत कार्य करूनही हे स्थान वाढत नाही. यामध्ये नागरिकांची मानसिकता आणि त्यांच्या सवयी महत्वाचा अडसर ठरत आहे. या सवयी बदलून त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. हे कार्य उपद्रव शोध पथकाद्वारे केले जात आहे. या कार्यातील गती वाढवून स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नागपूरचे स्थान किमान २५ पर्यंत नेण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी पथकाला केले.

कॉटन मार्केटमध्ये मोठ्या दुकानदारांकडून प्लास्टिकचा सर्सास वापर केला जातो, त्याची विक्री केली. मात्र पथकाकडून कारवाईसाठी गेल्यास कारवाई न करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार पथकातील अधिका-याकडून करण्यात आली. प्लास्टिक निर्मूलनासंदर्भात कठोर कारवाई करण्यासाठी अडसर निर्माण करण्यात येणा-या स्थळी पोलिस बंदोबस्तात पथकाद्वारे कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. उपद्रव शोध पथकातील कर्मचा-यांचा विमा काढण्याबाबत सूचना यावेळी मांडण्यात आली. याबाबतीत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही महापौर म्हणाले.