Published On : Tue, Dec 3rd, 2019

प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करा : महापौर संदीप जोशी

Advertisement

प्रसाधनगृहांच्या स्थितीबाबत आढावा बैठक

नागपूर : शहरात गर्दीच्या ठिकाणी, बाजार, चौकांमध्ये व इतररत्र काही ठिकाणी मुतारी, शौचालय, प्रसाधनगृह तयार करण्यात आली आहेत. शहराची लोकसंख्या पाहता प्रसाधनगृहांची संख्या तोकडी आहे. मात्र जी प्रसाधनगृहे आहेत त्यांचीही अवस्था चांगली नाही. त्यामुळे मुतारी, शौचालय, प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकी एका जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करून त्या व्यक्तीचे नाव व संपर्क क्रमांक संबंधित प्रसाधनगृहावर लिहण्यात यावे. मुतारी, शौचालय अथवा प्रसाधनगृहामध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

आरोग्य विभाग (स्वच्छता) अंतर्गत शहरातील प्रसाधनगृहांच्या स्थितीबाबत मंगळवारी (ता.३) महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, प्रतोद दिव्या धुरडे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, धंतोली झोन सभापती लता काडगाये, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, लकडगंज झोन सभापती राजकुमार साहु, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, स्वच्छ भारतचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, कार्यकारी अभियंता राजेंद्र रहाटे यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी व प्रसाधनगृहांची देखरेख व स्वच्छता करणा-या एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी झोननिहाय प्रसाधगृहांची संख्या व त्यांच्या स्थितीचा महापौरांनी आढावा घेतला. शहरात मनपा, रोटरी, सुलभ व इतर एजन्सीकडून मुतारी, शौचालय, प्रसाधनगृहांची देखभाल व स्वच्छता केली जाते. मात्र प्रत्यक्षात अशा ठिकाणी नेहमीच अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे जबाबदारी देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येक प्रसाधनगृहासाठी जबाबदार व्यक्ती निर्धारित करून त्याचे नाव संबंधित प्रसाधनगृहावर दर्शविण्यात यावे. प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसह त्याच्या सभोवतालची दोन्ही बाजूची प्रत्येकी ५० फुट जागा स्वच्छ ठेवणे ही ‘त्या’ व्यक्तीची जबाबदारी राहिल. त्यामुळे प्रसाधनगृह व त्या जवळ अस्वच्छता आढळल्यास जबाबदारी निश्चीत केलेल्या व्यक्तीवरच प्रथम कारवाई केली जाईल, असेही महापौरांनी बजावले.

शहरात अनेक सुलभ शौचालय असून त्यांचीही अवस्था वाईट आहे. याबाबत योग्य स्वच्छता आणि देखभाल दुरूस्तीबाबत सुलभतर्फे ३१ डिसेंबरचा अवधी मागण्यात आला. ३१ डिसेंबरनंतर महापौर स्वत: शहरातील सर्व प्रसाधनगृहांची पाहणी करणार असून यावेळी अस्वच्छता आढळल्यास स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, अशीही तंबी महापौर संदीप जोशी यांनी दिली.

आज शहरात प्रसाधनगृहांची संख्या तोकडी आहे. त्यामुळे संपूर्ण महापौर निधी हा केवळ प्रसाधनगृहांच्या निर्मितीसाठीच वापरण्यात येणार आहे. बाजार वा इतर गर्दीच्या ठिकाणी महिलांची होणारी कुचंबणा लक्षात घेता शहरात प्राधान्याने प्रसाधनगृहांची निर्मिती केली जाणार आहे.

त्यामुळे लोकप्रतिनिधींसह अधिका-यांनीही उपलब्ध जागेची माहिती द्यावी, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी केले. शहरातील इतर ठिकाणप्रमाणेच मनपा मुख्यालयातीलही प्रसाधनगृहांची अवस्था वाईट आहे, त्यामुळे याबाबतही संबंधित अधिका-यांकडून त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. येत्या काही दिवसांतच शहरातील विविध ठिकाणांसह मनपा मुख्यालयातील प्रसाधनगृहांचीही आकष्मिक पाहणी केली जाणार आहे. यावेळी प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.