Published On : Thu, May 31st, 2018

भंडारा-गोंदियाच्या विजयानंतर मोदींच्या हुकुमशाहीविरोधावर शिक्कामोर्तब – नवाब मलिक

Nawab Malik
मुंबई: भंडारा-गोंदियाचा निकाल म्हणजे मोदींच्या हुकुमशाहीविरोधावर शिक्कामोर्तब झाले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये देतानाच पालघरमध्ये मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला नाहीतर तीही जागा भाजपला जिंकता आली नसती अशी टिकाही नवाब मलिक यांनी यावेळी केली.

बहुजन विकास आघाडीला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दयावा अशी भूमिका आमची होती. असे झाले असते तर भाजपला पालघरही जिंकता आले नसते. भाजपने सत्तेचा दुरुपयोग करत, अफाट पैसा खर्च करत आणि सरकारी यंत्रणेचा वापर करत ही निवडणूक जिंकली. सामदामदंडभेदाचा वापर भाजपने केला असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

चार लोकसभा निवडणूकांचा आज निकाल जाहीर झाला असून निकालाचा कल बघितला तर भाजप पालघर वगळता कुठेच आपले अस्तित्व दाखवू शकलेला नाही. याशिवाय १० विधानसभा पोटनिवडणूकांमध्ये एक बिनविरोध झाली आहे. यांचाही निकाल बघितला तर भाजपच्या पराभवाची सुरुवात झाली आहे.

भंडारा-गोंदियामध्ये माजी खासदार नाना पटोले यांनी मोदींच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला होता. सरकार कोणताही निर्णय घेत नाही. हे सरकार भांडवलदारांचे काम करत आहे. हे बोलण्यापासून नाना पटोले यांना रोखण्यात आले होते. त्यामुळेच नाना पटोले यांनी राजीनामा दिला आणि ही निवडणूक झाली.

भंडारा-गोंदियातही भाजपने तसा प्रयत्न केला. भाजपने आचारसंहितेचा भंग केला. सत्तेचा दुरुपयोग केला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तात्काळ विरोध केला आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वाटण्याचा प्रयत्न फसला. अनेक ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाला होता. ईव्हीएम मशीनबाबत लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे ४९ ठिकाणी फेरमतदानही घेण्यात आले. आज अनेक विकसनशील देशांमध्ये बॅलेटपेपरने मतदानप्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याचा विचार करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

भाजप-शिवसेना एकसंघ राहिले काय किंवा विरोधात लढले काय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समविचारी घटक पक्ष एकत्रित येवून २०१९ च्या निवडणूकीमध्ये या सत्ताधाऱ्यांना खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

पत्रकारपरिषदेच्या सुरुवातीला राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाच्यावतीने राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रध्दांजली वाहिली. महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावला असून त्यांच्या कुटुंबाच्या दु:खामध्ये राष्ट्रवादी पक्ष सहभागी आहे असे स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, संजय तटकरे, महेश तपासे उपस्थित होते.