
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)च्या नागपूर शहर कार्यालयात आयोजित दीपावली मिलन सोहळ्यात झालेल्या लावणी नृत्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून, शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल-
दीपावली मिलनाच्या निमित्ताने नागपूर शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात लावणी सादर करण्यात आली. यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकल्या क्षणापासूनच पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
‘पक्षाची प्रतिमा धोक्यात’, नोटीसमध्ये स्पष्ट उल्लेख-
या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश महासचिव आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांनी शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांना सात दिवसांच्या आत लिखित स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे. नोटीसमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे की, “पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नृत्य आणि गायनाचे सादरीकरण करण्यात आले. या दृश्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसार होऊन पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे.”
वरिष्ठांकडून कारवाईची शक्यता-
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणाची माहिती घेतली असून, त्यांनी याला शिस्तभंगाचे प्रकरण मानले आहे. नेतृत्वाकडून चेतावणी देण्यात आली आहे की, ठराविक मुदतीत समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास संबंधितांविरोधात अनुशासनात्मक कारवाई केली जाईल.
पक्षातील नाराजी वाढली-
या घटनेमुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काहींनी या कार्यक्रमाला “संस्थेच्या मूल्यांना धोका” म्हटले असून, “पक्ष कार्यालय हे सांस्कृतिक मंच नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामुळे अजित पवार गटाच्या संघटनात्मक शिस्तीवर आणि प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.









