
नागपूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘महा एल्गार ट्रॅक्टर मोर्चा’ आज नागपुरात दाखल झाला असून, या आंदोलनाला राज्यभरातून हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थान ‘रामगिरी’ परिसरात पोलिसांनी सुरक्षा अधिक वाढवली आहे.
बैठकीला नाही जाणार, पण लढा थांबणार नाही-
कर्जमाफीवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून बैठकीचं आमंत्रण आलं असलं तरी, बच्चू कडूंनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला, “आम्ही दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत थांबणार आहोत. त्यानंतर जर निर्णय झाला नाही, तर आमचा मोर्चा थेट रामगिरीपर्यंत जाणार.”
शेतकऱ्यांचा प्रश्न जात-पात विसरून-
कडू म्हणाले, “ही केवळ कर्जमाफीची लढाई नाही, ही शेतकऱ्यांच्या जगण्याची लढाई आहे. जाती-धर्म, पक्षभेद विसरून प्रत्येक शेतकरी आता एकत्र येतो आहे. आम्ही मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री बावनकुळे यांना आमच्या मागण्या कळवल्या आहेत. तीन ते चार वाजेपर्यंत त्यांनी निर्णय घ्यावा, एवढीच अपेक्षा आहे.”
ही लढाई एका दिवसाची नाही-
कडू पुढे म्हणाले, “आम्ही रायगडपासून आंदोलन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांची वेदना संपेपर्यंत ही चळवळ सुरूच राहील. ही दोन दिवसांची लढाई नाही – ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठीची दीर्घ लढाई आहे. आम्ही संयमाने पण ठामपणे आंदोलन करणार आहोत.”
पोलिसांचा नागपूरमध्ये तगडा बंदोबस्त-
मोर्चा रामगिरीकडे निघू शकतो, अशी शक्यता गृहित धरून नागपूर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. रामगिरी परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर पोलीस दल तैनात आहे. शहरातील काही प्रमुख मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासन शेतकरी नेत्यांशी संवाद साधून तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे. नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून, राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.










