Published On : Thu, Jun 11th, 2020

राष्ट्रवादीने छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा जपला आणि तो शेवटपर्यंत जपणार – जयंत पाटील

Advertisement

वर्धापन दिनानिमित्त फेसबुक माध्यमातून कार्यकर्त्यांशी साधला संवाद…

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा, धर्मनिरपेक्ष विचारांचा वारसा जपला आहे आणि शेवटपर्यंत तो जपला जाणार आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

राज्यावर एकामागून एक संकट येत आहे. काल परवा कोकणात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे झोकून काम करावे. लोकांच्या मदतीला धावून जावे आपण कोकणाला पुन्हा उभे करू असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

२०१९ निवडणूक ही अभूतपूर्व होती. अनेकांना पवारसाहेबांनी सर्व काही दिलं मात्र ते पक्ष सोडून गेले. पक्षाचे मोठे नुकसान झाले मात्र आपला पक्ष पुन्हा उठून उभा राहिला. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पराभव केला आहे याची आठवण जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली.

पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार आता स्थापन झाले आहे. आपल्याला सर्वच घटकांसाठी काम करायचे आहे म्हणून आपण सामाजिक न्याय हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतले. त्यामाध्यमातून आपल्याला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायचे आहे तशाप्रकारे कार्यकर्त्यांनी कार्य करावे असा मोलाचा सल्लाही दिला.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार निवडून आला आहे. येत्या काळात आपल्याला मुंबईत पक्ष मजबूत करायचा आहे. औरंगाबाद, नवी मुंबई, ठाणे इतर शहरातही निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांनी त्यासाठी आतापासूनच तयार रहावे. ग्रामपंचायत निवडणुकाही येणार आहेत त्यासाठीही सज्ज व्हावे. आज वर्धापनदिनीही पवारसाहेब कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणाने कधी पवारसाहेबांची साथ सोडली नाही. त्यामुळे आपल्याला पुन्हा आपल्या त्या कार्यकर्त्यांशी जोडलं जायचे आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस ही युवकांच्या हातात द्यायची आहे. आम्ही तिशीत असताना आदरणीय पवारसाहेबांनी आमच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या. आम्ही त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या याची आठवण जयंत पाटील यांनी सांगितली. तेव्हा युवकांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा असे आवाहनही जयंत पाटील यांनी युवकांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस येत्या काळात हा सर्वात मोठा डिजिटल पक्ष ठरणार आहे. आपण राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय हे अभियान राबवत आहोत. अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असेल जिथे या अभियानाच्या माध्यमातून दुहेरी संवाद साधला जात आहे. मागच्या निवडणूकांमध्ये अनेकांनी बुथची बांधणी खुप चांगली केली त्यामुळे आपल्याला यश आले अशी कबुलीही जयंत पाटील यांनी दिली.

सोशल मीडिया ही आपल्या पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे. काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधी पक्ष चुकीची माहिती पसरवत होता मात्र २०१९ साली लोकांनी साहेबांच्या विचारांचा स्वीकार केला. संपूर्ण सोशल मीडिया साहेबमय झाला. आज हाच सोशल मीडिया आपली ताकद आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आज आपल्याला ५४ जागा निवडून आल्या आहेत त्या जागा आपल्याला १०० च्या पलिकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोरोनाची महामारी संपली की आम्ही सर्वच नेते राज्याचा दौरा करणार आहोत. आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे. पवारसाहेबांचे विचार घरोघरी पोहोचवायचे आहे. त्यामुळे आपल्या सर्वांनाच प्रचंड मेहनत घ्यावी लागेल असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

आज महाराष्ट्रावर भीषण संकट ओढावले आहे. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृतांप्रती जयंत पाटील यांनी शोक व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या संकटाच्या काळात अनेक कोविड योद्धा फिल्डवर जाऊन काम करत आहे. पोलीस बांधव असतील, डॉक्टर असतील, आरोग्य सेवक असतील, सफाई कर्मचारी असतील, आशा वर्कर्स असतील सर्वच जण मोठ्या चिकाटीने या युद्धात लढत आहेत. आज सावित्रीबाई फुलेंची आठवण होत आहे. प्लेगची साथ होती त्यावेळी सावित्रीबाई अशाचप्रकारे लोकांची सेवा करत होत्या. लोकांची सेवा करताना प्रसंगी त्यांना प्लेगमुळे आपला जीव गमवावा लागला मात्र त्या मागे हटल्या नाही. म्हणून आता जे कोणी लढा देत आहे त्यांच्याप्रतीही जयंत पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.