Published On : Wed, Nov 6th, 2019

राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी करुन निवडणूक लढविली आहे त्यामुळे निर्णय एकत्रितच होईल – शरद पवार

दिल्लीतील पोलिसांवरील हल्ल्यावर व्यक्त केली चिंता…

अयोध्या प्रकरणाचा न्यायालयीन निवाडा काही लागो सर्वांनी संयम बाळगावा…

मुंबई : आम्हाला लोकांनी विरोधात बसण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे सध्या विरोधातच आहोत. मुळात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करुन निवडणूक लढवली आहे त्यामुळे निर्णय मिळूनच घेणार आहोत अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

सध्या कोण सरकार स्थापन करणार यावर राजकीय गरमागरमी सुरु असताना आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार काय बोलणार यावर शक्यता वर्तविल्या जात होत्या. मात्र शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत या सगळ्या शक्य शक्यतांना आपल्या शैलीत उत्तर देवून आणखी उत्सुकता वाढवली आहे.

दिल्लीत पोलिसांना जी वागणुक मिळाली आहे त्याबद्दल खंत व्यक्त करतानाच युनिफॉर्म असलेल्या व्यक्तींवर हल्ला होतो. म्हणजे संरक्षण करणारी यंत्रणा संकटात येते आहे हे स्पष्ट होत आहे. राज्यात व देशात पोलिसांची अवस्था सध्या गंभीर आहे. पोलिसांना २४- २४ तास ड्युटी करावी लागते. कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे जर कोसळले तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पोलिसांना दिल्लीतील नागरीकांनी पाठींबा दिला होता. त्याबद्दल दिल्लीच्या नागरीकांचे आभार व त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे असेही शरद पवार म्हणाले.

याप्रकरणी बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन मिश्रा हे माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. त्यांना विनंती आहे. याप्रकरणी सहकार्य करा. असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

असा प्रकार घडला असून केंद्राला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. देशाचे गृहमंत्री आहे. त्यांनी याची दखल घेतली काय माहित नाही परंतु ही गंभीर परिस्थिती आहे असेही शरद पवार म्हणाले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. केंद्रसरकारकडून मदत मिळावी म्हणून प्रयत्न करणार आहे. बाधित शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांना पीकबियाणे तात्काळ द्यावे. मात्र विमा कंपन्या जबाबदारी पार पाडायला तयार नाही असे सांगतानाच केंद्रातील अर्थमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधितांना सुचना द्यावी असेही शरद पवार म्हणाले.

अयोध्या प्रकरणाचा निर्णय ६ नोव्हेंबरला लागणार होता. आता कुठला दिवस ठरेल तो ठरेल. परंतु कुठल्याही घटकांनी आपल्या विरोधात निर्णय आहे असं वाटून घेवू नये असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

न्यायालयीन निवडा मान्य करावा. कायदा हातात घेऊ नये. त्या काळात बाबरी हल्ला झाला तशी स्थिती होवू नये. यासाठी सतर्क रहावे असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

राज्याच्या स्थितीबद्दल बोलण्यासारखं काही नाही. भाजप – सेनेला कौल दिला आहे. त्यांनी सरकार बनवावं. कॉंग्रेस व राष्ट्रवादी विरोधी पक्षांना काम करण्याची सुसंधी दिली आहे ती आम्ही पार पाडणार आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांचा संयम सुटु नये असं काम करु नये. विमा कंपन्यांना विश्वासात घ्यावे असेही शरद पवार म्हणाले.

रोडचे काम घेवून अहमद पटेल गेले असतील असं मला वाटतं दुसरं काही कारण नाही असे भाष्य शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केले.

सेना – भाजप २५ वर्षाची युती आहे मग त्यांनी सत्ता स्थापन करावी. युतीमध्ये सडली असं म्हणाले तरी ते युती करुन लढले असा टोलाही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार हेमंत टकले उपस्थित होते.