मुंबई – भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र व उत्साहवर्धक सणांपैकी एक असलेली नवरात्र उत्सवाची धूम यंदा २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. दहा दिवस चालणारा हा उत्सव २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमीसह संपन्न होईल.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. सूर्योदयानंतरचा ब्राह्ममुहूर्त यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. गंगाजल, नाणी, पंचपल्लव ठेवलेला कलश, त्यावर ठेवलेला नारळ, जव-गव्हाची पेरणी आणि अखंड दिव्याच्या प्रकाशात देवीची आराधना असा हा पारंपरिक विधी असतो. सकाळ-संध्याकाळ आरती करून भक्त फुले, फळे व नैवेद्य अर्पण करतात. उपवास व जपाच्या माध्यमातून शक्तीची उपासना केली जाते.
या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
पहिल्या दिवशी शैलपुत्री,
दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी,
तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा,
चौथ्या दिवशी कुष्मांडा,
पाचव्या दिवशी स्कंदमाता,
सहाव्या दिवशी कात्यायनी,
सातव्या दिवशी कालरात्री,
आठव्या दिवशी महागौरी,
तर नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते.
नवरात्रीचे आणखी एक आकर्षण म्हणजे नऊ दिवसांचे नऊ रंग. पिवळा, हिरवा, राखाडी, केशरी, पांढरा, लाल, निळा, गुलाबी आणि जांभळा या रंगांचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. हे रंग जीवनात सकारात्मक ऊर्जा, उत्साह आणि भक्तिभाव जागृत करतात.
नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नसून श्रद्धा, साधना आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. भक्तिभावाने केलेली देवीची आराधना घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते, असा विश्वास आहे.