Published On : Mon, Feb 10th, 2020

नैसर्गिक संकटे टाळायचे असतील तर जैवविविधता जोपासा: गजभिये

“जैवविविधता व पाणथळ जागा” या विषयावर व्याख्यान संपन्न

रामटेक: पूर्व विदर्भ हा तलावासाठी ओळखला जातो या तलावांच्या पाणथळ जागेमुळे विदेशातील पक्षी हिवाळ्यात विदर्भात येत असतात.पण या तलावावर अतिक्रमण वाढल्याने पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास संकटात आले आहेत. तलावावरील जैवविविधता धोक्यात आली आहे मानवाला जर नैसर्गिक संकटे टाळायचे असतील तर ही जैवविविधता जोपासणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी मानद वन्यजीव संरक्षक अॅड.संजीव गजभिये यांनी केले.

श्री नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालय रामटेक येथे पाणथळ व जैवविविधता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संगीता टक्कामोरे या होत्या प्रमुख वक्ते म्हणून निसर्ग अभ्यासक पक्षीतज्ञ व माजी मानद वन्यजीव संरक्षक अॅड. संजीव गजभिये उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. नरेश आंबिलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.पाणथळ व जैवविविधता या विषयावर बोलताना अॅड. संजीव गजभिये यांनी सांगितले की पक्षी ज्या तलावाचे पाणी शुद्ध असेल तिथेच गर्दी करतात. देवधान,कमळ, लव्हाळे यासह अनेक पाणवनस्पती आढळतात.

संपूर्ण जलचर व पक्षी यांचे नाते तलावातील या सर्व गोष्टीवर अवलंबून असतात.मात्र मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी ही जैवविविधता विस्कळीत केली आहे.टोळधाडींना खाणाऱ्या पक्ष्यांच्या शिकारीमुळे अनेक देशात टोळधाडीने पिके उद्ध्वस्त केली आहेत‌. तलाव हे गोडे पाण्याचे मोठे स्रोत आहे.तेव्हा त्याचे संवर्धन करणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे यांनी जलसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे सांगून जल प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन कु. हिना शेंडे हिने केले.

पाहुण्यांचा परिचय करिष्मा चंदनकर हिने करून दिला.प्रस्ताविक कुंदन गजभिये यांनी तर आभार किरण मेश्राम हिने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश लेंडे, सुकन्या फुलबांधे,संचिता आकरे, दर्शना बरबटे,बबलू मडावी,दीक्षा वासुदेवे, चैताली बोरसरे,नेहा नाटकर, सुषमा हिंगे,सुप्रिया सोनवाने यांनी अथक परिश्रम घेतले