Published On : Tue, Nov 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

गोंदियात शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तनाचा आरोप; पालकांचा शाळेत गोंधळ, शिक्षकाला अटक!

Advertisement

गोंदिया : विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देऊन त्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकावरच अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप झाल्याने गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरी गावातील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार समोर आला आहे. सहावी आणि सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत शिक्षकाने अश्लील चाळे केल्याचा तसेच त्यांच्या शरीराच्या विविध भागांना अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती विद्यार्थिनींनी पालकांना दिल्यानंतर संतापलेल्या पालकांनी थेट शाळा गाठत शिक्षकाला जाब विचारला.

मिळालेल्या माहितीनुसार, सावरी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले नागोराव कटरे (वय ५५) यांच्याविरोधात विद्यार्थिनींनी गैरवर्तनाच्या तक्रारी केल्या आहेत. शिक्षकाकडून होत असलेल्या कथित त्रासाची माहिती मुलींनी पालकांना दिल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. पालकांनी शाळेत पोहोचून संबंधित शिक्षकाला जाब विचारला. हा प्रकार गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ शाळेच्या परिसरात जमा झाले. संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला चोप देण्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, संबंधित शिक्षकाला तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने याप्रकरणी योग्य कारवाई न केल्यास संपूर्ण गाव एकजुटीने मोठे आंदोलन छेडेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी विद्यार्थिनींसोबत घडल्याचा आरोप असलेल्या या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.