Published On : Fri, Sep 15th, 2017

महागाईचा डोंगर उभारणाऱ्या सरकारविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

मुंबई: आंतराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये क्रूड ऑईलचे दर घसरले असतानाही देशात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांक गाठत आहेत. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ ह्यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत तीव्र आंदोलन करण्यात आले. हातगाडीवर दुचाकी बांधून तर चारचाकी ओढत राष्ट्रवादीच्या महिलांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले.

महागाई कमी करण्याचे आश्वासन देत भाजपाप्रणित एनडीए सरकारने जनतेचा सर्वात मोठा विश्वासघात केला आहे. भाजपा सरकार अच्छे दिनचा दिंडोरा पिटत लोकांचा विश्वासघात करणारे सरकार असल्याचे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने नक्की कोणाला सुगीचे दिवस येणार आहेत हे सरकारने जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात दुष्काळ जाहीर न करता, पेट्रोल-डिझेलवर दुष्काळ कर कशासाठी घेतला जातोय असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचे काम सरकारने बंद करावे असा इशारा दिला. या आंदोलनासाठी राष्ट्रवादीच्या मुंबई महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.