Published On : Sat, Jun 3rd, 2023

राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी ; अजित पवार, जयंत पाटील आज नागपुरात !

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय ओबीसी शिबिरासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नागपुरात दाखल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन दिवसीय ओबीसी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या निवडणुकांसाठी ओबीसी मते आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रवादीची ही रणनीती असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. रेशीमबागेतील महात्मा फुले सभागृहात तीन आणि चार जूनला हे शिबिर होऊ घातले आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता.३) शिबिराचे उद्‍घाटन होणार आहे.

Advertisement

शिबिरात राज्यभरातून सुमारे सातशे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, ओबीसीचे राष्ट्रीय नेते व माजी मंत्री छगन भुजबळ, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे आदीही शिबिरात उपस्थिती लावणार आहेत.

शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, आमदार अमोल मिटकरी, ॲड. अंजली साळवे, धनगर युवा नेत्या सक्षणा सलगर, विकास लवांडे, अविनाश काकडे हे ओबीसींच्या विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करतील. अजित पवार आणि जयंत पाटील नागपुरात दाखल होणार आहेत. तत्पूर्वी हे दोन्ही नेते चंद्रपूरला जाऊन दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करतील. दोन्ही नेते नागपूरला आल्यानंतर दुपारी दोन वाजताच्या सुमारास ओबीसी शिबिराच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

Advertisement
Advertisement
Advertisement