नागपूर: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत नागपूर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मैदानावर करण्यात आले होते.
यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार तसेच जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी राष्ट्रीय एकता दौड रॅलीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. संपूर्ण देशामध्ये आज राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात आली होती. या रॅलीच्या माध्यमातून एकात्मतेचा तसेच आरोग्य जपण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी महानगरपालिका उपायुक्त महेश मोहिते, क्रीडा व युवक संचालनालय, पुणे प्रभारी आयुक्त जयप्रकाश दुबळे, उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, मनपा क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर, सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या श्रीमती मीना जेटली आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय एकता दौडच्या सुरुवातीला महापौर श्रीमती नंदा जिचकार तसेच जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभागी पोलिस दलाचे जवान, खेळाडू, प्रशासकीय कर्मचारी शालेय विद्यार्थी तसेच उपस्थितांना ‘राष्ट्रीय एकात्मता दिवसाची’ शपथ दिली.
नागपूर जिल्ह्यातील सुमारे 300 विद्यार्थी राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रीय एकता दौडची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मैदानावरुन करण्यात आली. यानंतर लॉ कॉलेज रोड मार्गाने ती परत विद्यापीठ मैदानावर येवून राष्ट्रीय एकता दौडचा समारोप झाला. सुमारे 3 किलोमीटर मार्गाची परिक्रमा यावेळी करण्यात आली. यावेळी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले ‘सरदार पटेल-सचित्र जीवनी’ या पुस्तकाचे प्रकाशन महापौर श्रीमती नंदा जिचकार तसेच जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
