
नागपूर : आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी समाज आणि आरोग्यदायी भविष्य घडविण्याच्या उद्देशाने ११वा आयुर्वेद दिन बुधवारी (२३ सप्टेंबर) नागपुरात साजरा करण्यात येणार आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहात होणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मंगळवारी सिव्हिल लाइन्स येथील प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली.
राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचे कुलगुरू प्रो. डॉ. संजीव शर्मा आणि केंद्रीय आयुर्वेदीय अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्रो. वैद्य रबिनारायण आचार्य यांनी पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यंदाच्या आयुर्वेद दिनाची ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ ही मुख्य संकल्पना असून ‘एक आरोग्य, एक भविष्य : प्रमाण, नवकल्पना आणि समग्र उपचारातून आयुर्वेद विज्ञानाचा विस्तार’ हा उपविषय आहे.
या कार्यक्रमात आयुर्वेदाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय प्रकाशने आणि डिजिटल उपक्रमांचे लोकार्पण होणार आहे. गोक्षुर आणि चंद्रशूर यावरील सुरक्षा डोसियर, त्वचारोगांवरील मानक उपचार मार्गदर्शक तत्त्वे, ‘आयुष सेवा क्षेत्र’ अहवाल, ‘आयुष व्हिजन २०३०’ अहवाल तसेच सीसीआरएएस-अग्नि मूल्यांकन स्केल वेब पोर्टलचा यामध्ये समावेश आहे. आयुर्वेदाधारित उत्पादनांमध्ये गुणवत्ता मानकांचे पालन करणाऱ्या तीन पात्र उद्योगांना ‘आयुष गुणवत्ता चिन्ह’ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात असंसर्गजन्य आजारांचा वाढता भार कमी करण्यासाठी समन्वित उपचारपद्धतींची भूमिका तसेच २०४७ पर्यंत आयुर्वेदाच्या वाटचालीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. आयुर्वेद शिक्षण, संशोधन आणि उपचार क्षेत्रातील तज्ज्ञ, चिकित्सक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
आयुष मंत्रालयाच्या वतीने सीसीआरएएस आणि राष्ट्रीय आयुर्वेद संस्था, जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्था, नागपूर यजमान आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयुष मंत्रालयाच्या यूट्यूब, फेसबुक आणि एक्स या समाजमाध्यमांवर करण्यात येणार आहे.




