
सोलापूर : अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. महासभेचे प्रदेशाध्यक्ष पंकजसिंह ठाकूर यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. राष्ट्रीय अध्यक्ष हरिवंशसिंह यांच्या सूचनेनुसार राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
अखिल भारतीय क्षत्रिय महासभेची स्थापना 1897 मध्ये झाली असून, संघटनेचा विस्तार देशभरात आहे. क्षत्रिय समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सामाजिक प्रश्नांसाठी ही संघटना कार्यरत आहे. नरेंद्रसिंह ठाकूर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत वरिष्ठांनी त्यांच्यावर सोलापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्य
नरेंद्रसिंह ठाकूर यांनी युवा राजपुताना संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. संजय गांधी निराधार योजना तसेच विधी सेवा समितीच्या सदस्यपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. याशिवाय पतित पावन संघटनेचे तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस आणि किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
अयोध्येतील सैन्य शहीद स्मारक ट्रस्टचे सहसचिव म्हणूनही ते कार्यरत आहेत. डिजिटल मीडिया तालुका सचिवपदाची जबाबदारी सांभाळतानाच विविध सामाजिक आंदोलनांमध्ये सहभागी होऊन त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे.
शिक्षण, रोजगार आणि सामाजिक जनजागृतीवर भर
जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर क्षत्रिय समाजासोबतच समाजातील उपेक्षित घटकांच्या प्रश्नांनाही प्राधान्य देणार असल्याचा मनोदय नरेंद्रसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ, शिक्षण, संस्कृती आणि रोजगाराच्या संधी याबाबत जनजागृती करण्यावर त्यांचा भर राहणार आहे.
तसेच विवाहविषयक समस्या, मुला-मुलींच्या अपेक्षा आणि विवाहास होणारा विलंब यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर समाजात संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धन आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानासाठीही काम करण्याचा त्यांचा मानस आहे.
निवडीनंतर विविध स्तरांतून नरेंद्रसिंह ठाकूर यांचे अभिनंदन होत आहे. लवकरच जिल्ह्याचा दौरा करून जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.



