Published On : Mon, Oct 9th, 2017

सत्तांधळ्यांना नांदेडचा विकास कसा दिसणार

नांदेड: ज्या नागपूर शहरात पावसाळ्यात पाण्यात डांबर टाकून रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. जिथे केवळ उद्योग आणण्याच्या घोषणा होतात. मात्र वास्तवात काहीच होत नाही त्या शहराचे उदाहरण देऊन विमानतळापासून कार्यक्रम स्थळापर्यंत गुळगुळीत रस्त्यावरून प्रवास करून सुध्दा नांदेडचे वाटोळे केले असे जे म्हणतात अशा सत्तांधळ्यांना नांदेडचा विकास कसा दिसेल असा सवाल करून राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला.

नागपूरात युपीए सरकारच्या काळात मिहान प्रकल्प आणला उद्योगाची मोठ्या प्रमाणात या शहरात उभारणी होत होती त्याच काळात सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने मात्र उद्योगाच्या नावाखाली केवळ शेतक-यांच्या जमिनी हडप केल्या आणि त्या जमिनी धनिकांच्या स्वाधीन केल्या त्यांनीच येऊन नांदेडात विकासाचा उपदेश करावा याचे मला आश्चर्य वाटते असेही ते म्हणाले.

नांदेड शहरातील बेघरांना बीएसयुपीच्या माध्यमातून 17 हजार घरे देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले. उर्वरित 8 हजार बेघरांना घरे देण्याचा प्रकल्प एनटीसी मीलची जागा भाजप सरकारने हस्तांतरीत न केल्याने प्रलंबीत आहे. अशा लोकांना घरे देण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरु आहे पण या कामात सुध्दा केंद्र सरकार अडचणी आणत आहे.

नांदेड शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, सुसज्ज सरकारी दवाखाना व वैद्यकीय महाविद्यालय, सुंदर बगीचा, सिमेंट क्राँकीट चे मुख्य रस्ते पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना भव्य शासकीय वास्तू हे सर्व पाहण्यासाठी दृष्टी लागते परंतु सत्तेची नशा डोळ्यावर आल्यामुळे देवेंद्र फडणवीस सत्तांधळे झाले आहेत त्यामुळे त्यांना नांदेडचा विकास दिसत नाही. खरे तर नरक यातना नागपूर, पुणे, नाशिक मध्ये राहणा-या झोपडपट्टीतील नागरिक भोगत आहेत. दलबदलूंना सोबत घेऊन महापालिकेत सत्ता काबीज करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न 12 ऑक्टोबर रोजी धुळीस मिळालेले असेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.