नागपूर – नंदनवन परिसरातील सुरक्षा रक्षकाच्या खुनाच्या प्रकरणात नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश नारनवरे (वय २४, रा. तुमसर) असे असून तो एक हार्डकोर गुन्हेगार आहे. त्याच्यासोबतचा दुसरा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
१३ जून रोजी मध्यरात्री वाठोडा रिंगरोडवरील शिवशंकर लॉनजवळील स्क्रॅप दुकानावर सुरक्षा रक्षकावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ६० वर्षीय अब्दुल रहीम शेख हुसैन गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.
सीसीटीव्ही आणि दुचाकीच्या साहाय्याने उकलला गुन्हा-
गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमधून हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी ओळखण्यात आली. ती दुचाकी अंबाझरी येथील पार्क स्ट्रीट अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची असल्याचे निष्पन्न झाले. क्राईम ब्रँचनं त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरी झाल्याचे सांगितले.
इमारतीतील इतर सीसीटीव्ही फुटेज, आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटली. हल्ल्यानंतर आरोपी आपले गाव तुमसर येथे पळून गेला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला तिथेच अटक केली.
चोरीच्या उद्देशाने केला खून-
चौकशीत आरोपीने कबूल केले की, त्याने चोरीच्या उद्देशाने हा गुन्हा केला. त्याने आधी फ्लॅटच्या पार्किंगमधून दुचाकी चोरली व एका मित्रासोबत वाठोडा येथे स्क्रॅपच्या दुकानाजवळ पोहोचला. गार्ड झोपलेला असताना, तो जागा होऊ नये म्हणून त्याच्या डोक्यावर काठीने मारहाण केली. गार्डचा मोबाईल आणि अन्य वस्तू घेऊन दोघे फरार झाले. विशेष म्हणजे गुन्हा करून दुचाकी पुन्हा त्याच ठिकाणी ठेवून ते नागपूरमधून पसार झाले.
ही घटना समोर आल्यानंतर एक गंभीर बाब उघड झाली आहे की, इतक्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी कुठल्याही कागदपत्रांशिवाय गार्ड म्हणून नोकरीस ठेवण्यात आला होता. आकाश नारनवरे याच्यावर याआधीही हत्या व चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून तो मौदा खून प्रकरणात दीड वर्ष तुरुंगात होता. तिथून सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी वळण पकडले.