Published On : Fri, Jul 13th, 2018

शालेय पुस्तकात गुजराती भाषा; सरकारने माफी मागावी – सुनिल तटकरे

नागपूर : इयत्ता ६ वीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती भाषेत धडे शासनाने प्रसिध्द केल्याची माहिती आमदार सुनिल तटकरे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे उपस्थित करुन सरकारने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली.

सरकारच्या या बेगडी मराठीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे विधानपरिषदेचं कामकाज अर्धा तासासाठी स्थगित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी प्रकाशित केलेल्या सहावीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती भाषेचा वापर करण्यात आला असून हा मराठी भाषेचा अपमान असल्याचे सांगत सरकारने दिलगिरी व्यक्त करुन जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. मराठी भाषेचा अपमान असून सरकार किती लाचारी करणार असा संतप्त सवालही तटकरे यांनी सभागृहात उपस्थित केला.

दरम्यान या गंभीर विषयावर जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी याबाबत सरकारने खुलासा करावा आणि तात्काळ दुरुस्ती करावी असे निर्देश सरकारला दिले.