Published On : Thu, Aug 16th, 2018

आता राज्यातच राहणार-नाना पटोले

Advertisement

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत, खासदारकीचा राजीनामा देणारे बंडखोर नाना पटोले यांनी दिल्लीतील राजकारणाला रामराम ठोकला. यापुढे दिल्लीत जाणार नाही, राज्याच्या राजकारणातच राहणार असल्याची घोषणा पटोले यांनी बुधवारी एका कार्यक्रमात केली.

मुंबई शिक्षक मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळविल्याबद्दल जनता दल (लोकतांत्रिक)चे आमदार कपिल पाटील यांच्या नागरी सत्काराचा सोहळा गोरेगाव येथे पार पडला. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नाना पटोले आदी नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान कार्यालयात अनेक फायली पडून आहेत.

उद्योगपती अंबानी यांची इच्छा असेल, त्याच फायलींचा निपटारा केला जातो. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर कोणत्याच खासदाराला बोलता येत नाही. खासदारांच्या बैठकीत वयस्कर आणि ज्येष्ठ खासदारांचाही अपमान केला जातो. देशात अघोषित आणीबाजी लागू झाली. यापुढे राज्यातच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते फुले पगडी घालून शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

स्तंभ धोक्यात – मुंडे
सरकारविरोधी बोलणारा प्रत्येक आवाज दाबला जात आहे. नाना पटोले यांनीच सर्वप्रथम मोदींविरोधात बोलण्याचे धाडस केल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत. संविधानही धोक्यात आले आहे. संविधानाला विरोध करणाºया मंडळींना पंतप्रधान मोदी यांनी आजच्या भाषणातून ठणकवायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. आजची अराजकता पाहता, निर्वाणीच्या लढाईला तयार राहावे लागेल, असे धनंजय मुंडे म्हणाले.