नागपूर : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला. सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देत त्यांनी गणरायाच्या चरणी सर्वांचे दुःख दूर करून सुख-समाधान मिळावे, अशी प्रार्थना केली. मात्र, याचवेळी महागाई, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, मराठा आरक्षण, समान नागरी कायदा आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला लक्ष्य केले.
सरकारने महागाई कमी केली असती तर गोरगरिबांच्या घरातही गणेशोत्सव अधिक आनंदात साजरा करता आला असता, अशी टीका पटोले यांनी केली. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
समान नागरी कायद्यावरून भाजपला टोला-
प्रत्येक निवडणुकीच्या वेळी समान नागरी कायद्याचा मुद्दा पुढे करून जनतेच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित केले जाते, असा आरोप नाना पटोले यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानात सर्व नागरिकांना समान अधिकार देण्यात आले आहेत. भाजपने समान नागरी कायद्याचा मसुदा समोर आणावा, त्यानंतर त्यावर चर्चा करता येईल, असे ते म्हणाले.
राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली आहे का?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पटोले यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारच्या काळात गुंडगिरी वाढली असून कोणालाही धमकी देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था नसेल तर सरकारकडून काय अपेक्षा करायची, असा सवाल त्यांनी केला.
मराठा आरक्षणावरून फडणवीसांना सवाल-
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरूनही पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. २०१४च्या निवडणुकीपूर्वी भाजपने राज्यात आणि केंद्रात सत्ता आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असेही सांगितले होते.
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप का सुटला नाही? आरक्षण देण्यापासून भाजपला कोणी रोखले, याचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी द्यावे. मराठा आणि ओबीसी समाजातील आंदोलनांमुळे महाराष्ट्राची देशात आणि जगात होत असलेली बदनामी थांबवण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी, असे पटोले म्हणाले.
महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती, तातडीने घोषणा करा-
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरूनही पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला. कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये गंभीर परिस्थिती असताना सरकार दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पोळ्याच्या दिवशी शेतकरी आत्महत्या करत असेल, तर हे सरकारचे अपयश आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर असून बीड आणि जालना जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.
राज्य लुटण्यासाठी एकत्र आलेत-
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय कुरघोडीवरूनही पटोले यांनी सरकारला टोला लगावला. “तीन तिघाडा, काम बिघाडा” अशी परिस्थिती असून महाराष्ट्र विकण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सत्तेतील नेते एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप करत असतील तर संबंधित मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
नरेंद्र मेहता प्रकरणावरूनही सरकारला घेरले-
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरील कथित जमीन प्रकरणावरूनही पटोले यांनी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. या प्रकरणासंदर्भात विधानसभेत पुराव्यांसह प्रश्न उपस्थित केल्याचा दावा त्यांनी केला. सरकारी तसेच खासगी जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप करत मीरा-भाईंदर परिसरात अशा प्रकारची कारवाई सुरू असल्याचे ते म्हणाले.
या प्रकरणाशी संबंधित पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले असल्याचा दावा पटोले यांनी केला. मात्र अद्याप कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित करत या प्रकरणात सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.




