
नागपूर : मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला असून, हे सरकार इंग्रजांपेक्षाही क्रूर असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली. दिल्लीतील सीजेपी आंदोलन, राहुल गांधी यांना आंदोलनापासून रोखण्याचे प्रयत्न, नागपुरातील गांधी घराण्याच्या पिंडदान आंदोलनासह विविध मुद्द्यांवर त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
सीजेपी आंदोलनावर बोलताना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्या आंदोलनाला चिरडण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी हजारो जवान तैनात करण्यात आले. दिल्लीतील मेट्रो, रेल्वे आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार मतचोरी करून सत्तेत आल्याचा दावा करत, आता निवडणूक आयोग आणि भाजपविरोधात देशभर आंदोलन पेटेल, असा इशारा त्यांनी दिला.
नागपुरात गांधी घराण्याच्या दिवंगत नेत्यांच्या नावाने करण्यात आलेल्या पिंडदान आंदोलनावरही पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. अशा नेत्यांबद्दल भाजपकडून असे कृत्य होणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, भाजपचा उगम नागपुरातील संघातून झाला असून, आता संघातच अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत पटोले म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत मत व्यक्त केल्याचा दावा त्यांनी केला. नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मतपत्रिकेवर होत असल्याने काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भंडारा येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येचा उल्लेख करत त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासमोर एका शेतकऱ्याने व्यथा मांडल्यानंतर दोन दिवसांनी त्याने आत्महत्या केल्याचे सांगत, सरकारच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचा उल्लेख करत पटोले यांनी देशातील आर्थिक परिस्थितीवरही भाष्य केले. तसेच नितेश कराळे मास्तर यांच्या उमेदवारीबाबत बोलताना, त्यांना मिळणाऱ्या मतांचा दुसऱ्या क्रमांकाचा वाटा अभिजीत वंजारी यांच्याकडे जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आगामी निवडणुकीतही अभिजीत वंजारी यांना संधी देण्याबाबत विचार केला जाईल, असे ते म्हणाले.



