Published On : Thu, Dec 5th, 2019

पदवीधर मतदार संघांसाठी जास्तीत – जास्त मतदार नोंदणी करा – जिल्हाधिकारी

– 1 नोव्हेंबर 2016 पर्यंतचे पदवीधारक करु शकतात नोंदणी

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी मतदानासाठी जास्ती जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी. विभागातील पदवीधर मतदार नोंदणीसाठी शासकीय व निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी आस्थापनांतील पदवीधर अधिकारी –कर्मचारी यांच्याकडूनही 9 डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करुन घेण्याचे निर्देश सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृह येथे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विभागप्रमुखांची आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा, मनपाचे सहा आयुक्त महेश धामेचा, तहसीलदार राहुल सारंग यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मतदार नाव नोंदणीच्या विशेष मोहिमेत पुरवणी यादी तयार करण्याचे काम सुरु असून, सोमवारी 9 डिसेंबरपर्यंत पदवीधरांना नावनोंदणी करता येणार आहे. त्यासाठी पदवीधर 1 नोव्हेंबर 2016 पूर्वीचा मान्यताधारक विद्यापीठाचा पदवीधारक असावा. यामध्ये मुक्त विद्यापीठाचा पदवीधारकही नाव नोंदणी करु शकतो, असेही त्यांनी सांगितले.

दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी सोमवार, दिनांक 9 डिसेंबर 2019 पर्यंत आहे. दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्याचा गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2019 तर मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी सोमवार, दिनांक 30 डिसेंबर 2019 होणार आहे. प्रारुप मतदार यादीमधील मतदारांची संख्या 17 हजार 423, अस्वीकृत अर्जाची संख्या 1 हजार 250 असून, 9 डिसेंबर 2019 पर्यंत दावे व हरकती स्वीकारता येणार आहेत. आज दि. 4 डिसेंबरपर्यंत 9 हजार 357 पदवीधारकांनी नावनोंदणी करण्यासाठी अर्ज भरले आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला सार्वजनिक न्यास नोंदणी, आदिवासी विभाग, भूमी अभिलेख, कोषागार कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, महानगरपालिका, नागपूर सुधार प्रण्यास, पंजाब नॅशनल बँक, नगर रचना, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नोंदणी उप महानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, अभियोग संचालनालय, सार्वजनिक बांधकाम मंडळ, वैधमापन शास्त्र, राज्य ग्राहक आयोग परिक्रमा खंडपीठ, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा न्यायालय यांच्यासह विविध शासकीय कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

पदवीधर मतदार नोंदणीकरिता पात्रता
पदवीधर भारताचा नागरिक असावा, पदवीधर मतदार नोंदणीकरिता अर्हता (1 नोव्हेंबर 2019)किमान 3 वर्षापूर्वी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्सम विद्यापीठाचा पदवी असावा, सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा, पदवीधराने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्र. 18 भरणे आवश्यक आहे, पदविका जर पदवीतुल्य असेल तरच पदवीधर गृहित धरण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

पदवीधर मतदार नोंदणीकरता आवश्यक इतर कागदपत्रे
रहिवासाचा पुरावा, (पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्ती, टेलीफोन/ वीज बिल किंवा इतर मान्यताप्राप्त कागदपत्रांची साक्षांकित प्रत), मार्क लिस्टची साक्षांकित प्रत, पदीवीची सांक्षाकित प्रत, विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्यास त्याबाबतचे राजपत्र, पॅन कार्ड, राजपत्र नसल्यास प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्रांचे साक्षांकन संबंधित जिल्ह्यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्य राजपत्रित अधिकाऱ्याकडून करुन घ्यावे, ही कागदपत्रे आपण पदनिर्देशित अधिकारी, तहसीलदार कार्यालय, 12 विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा करता येईल, असे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.