Published On : Wed, Jan 5th, 2022

३०० स्वातंत्र्य सेनानींच्या घरापुढे लागणार नाम फलक

Advertisement

स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाचा मनपा करणार गौरव

Advertisement

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणा-या नागपुरातील ३०० स्वातंत्र्य सेनानीं परिवाराच्या घरापुढे नागपूर महानगरपालिकेद्वारे त्यांच्या नावाचे नाम फलक लावण्यात येणार आहे. स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव यानिमित्ताने करण्यात येणार असून यासंबंधीची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत.

नागपूर शहरातील स्वातंत्र्य सेनानींच्या गौरवासंदर्भात मनपामध्ये महापौरांनी आढवा बैठक घेतली. या बैठकीत गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती हरीश दिकोंडवार, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त मिलींद मेश्राम, सहायक आयुक्त महेश धामेचा उपस्थित होते.

यावेळी महापौरांनी सांगितले की, नागपूर शहरातील ३०० स्वातंत्र्य सैनिकांची अधिकृत यादी मनपाला प्राप्त झाली. या सर्व स्वातंत्र्य सेनानींचे भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत मोठे योगदान आहे. त्यांच्या योगदानामुळे देश स्वतंत्र झाला. त्यांच्या योगदानाचा जनतेकडून गौरव करणे हे क्रमप्राप्त आहे. त्या अनुषंगाने ३०० स्वातंत्र्य सेनानींच्या परिवाराला महापौरांकडून एक गौरवपत्र देण्यात येईल.

परिवाराकडून त्यांच्या घरापुढे फलक लावण्याची परवानगी घेतली जाईल. परवानगी मिळाल्यानंतर घरापुढे फलक लावण्यात येईल. या फलकावर स्वातंत्र्य सेनानीचे नाव, त्यांचे योगदान यासह मनपा व आझादी-75 चा लोगो असेल. झोननिहाय नाम फलक लावण्याचे काम करण्यात येईल. या नाम फलकाच्या डिजाईनसाठी मनपा शाळांच्या शिक्षकांकडून सहकार्य घेतले जाईल, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.