
नागपूर – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील भाजप आणि शिंदे गटातील मंत्री व आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट देत नमन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. मात्र काही सत्ताधारी मंत्री-आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संघाचे शताब्दी वर्ष असल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष महत्त्व दिले जात होते. दरवर्षी अधिवेशन काळात आमदारांसाठी संघाकडून उद्बोधन वर्गाचे आयोजन केले जाते. मात्र यंदा अधिवेशनाचा कालावधी केवळ सात दिवसांचा असल्याने हा वर्ग होणार नसल्याची चर्चा होती. तरीही अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील सर्व आमदारांना रेशीमबाग येथे उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते.
सकाळी साडेसातनंतर मंत्री व आमदार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यंदा मात्र संघाकडून नेहमीप्रमाणे उद्बोधन टाळण्यात आले.
या वेळी विधानपरिषद सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संघाच्या वतीने अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख सुनील देशपांडे, ज्येष्ठ प्रचारक विकास तेलंग आणि महानगर कार्यवाह रविंद्र बोकारे उपस्थित होते.
दरम्यान, भाजप व शिंदे गटातील काही मंत्री-आमदार रेशीमबागेत पोहोचले नसल्याने त्यामागचे कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले.
याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची रेशीमबागेत भेट झाली. संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन बाहेर पडत असताना शिंदे तेथे पोहोचले. त्यानंतर दोघेही पुन्हा आत गेले आणि कॉफी घेत काही काळ चर्चेत रंगले. या ‘कॉफी चर्चा’नेही राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढवली आहे.








