नागपूर – हिवाळी अधिवेशनातील विधान परिषदेचे कामकाज आज संस्थगित करण्यात आले. अधिवेशनाची सांगता होत असताना पुढील अधिवेशन सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६ पासून मुंबईत होणार असल्याची घोषणा करण्यात आली. या अधिवेशनात विधान परिषदेचे एकूण ४८ तास १६ मिनिटे कामकाज पार पडले.
यामध्ये केवळ ४० मिनिटांचा वेळ वाया गेला, तर दररोज सरासरी ६ तास ५३ मिनिटे सभागृहाचे कामकाज झाले. सभागृहातील सदस्यांची एकूण उपस्थिती ८८.६८ टक्के नोंदवण्यात आली असून, सरासरी उपस्थिती ७५.४७ टक्के इतकी होती. अधिवेशन काळात एकूण ७ बैठका झाल्या, तर ३ शोकप्रस्ताव मांडण्यात आले. प्रश्नोत्तर तासात एकूण १,९०० तारांकित प्रश्न दाखल झाले, त्यापैकी २८० प्रश्नांना स्वीकृती देण्यात आली. याच काळात ६ अध्यादेश सादर करण्यात आले.
लक्षवेधी सूचनांची संख्या ४७२ होती. त्यापैकी ९७ सूचना मंजूर करण्यात आल्या, तर २५ सूचनांवर प्रत्यक्ष चर्चा झाली. औचित्याचे एकूण ११० मुद्दे उपस्थित झाले असून, त्यातील ८७ मुद्दे सभागृहात मांडण्यात आले. कायदेविषयक कामकाजात विधान परिषदेने ४ शासकीय विधेयकांना मंजुरी दिली. तसेच विधानसभेत आधीच संमत झालेली १४ विधेयके विधान परिषदेतही मंजूर करण्यात आली. एकूणच, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मर्यादित वेळेचा अपव्यय होत विधीमंडळाचे कामकाज तुलनेने सुरळीत पार पडल्याचे चित्र दिसून आले.









