मुंबई – नागपूरमधील ऐतिहासिक विधानभवन परिसराचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. येथील प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि भविष्यातील गरजांना तोंड देण्यासाठी या परिसराचा विस्तारीत विकास करण्यात येणार आहे. बुधवारी मुंबई येथील विधानभवनात हा महत्त्वाकांक्षी आराखडा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आला.
विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितले की, “हा प्रकल्प नागपूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाशी सुसंगत असावा, तसेच तो आधुनिक सुविधांनी युक्त असावा,” अशी अपेक्षा आहे.
या आराखड्याच्या सादरीकरणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्ध वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी या संकल्पनेचा आराखडा सादर केला.
आराखड्यानुसार, सध्या अस्तित्वात असलेल्या विधानभवनाच्या जागेवर सात मजली भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीची रचना ऐतिहासिकतेची आठवण करून देणारी असून, तिच्या अंतर्गत विधानसभा, विधान परिषद, सेंट्रल हॉल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय, तसेच विरोधी पक्षनेत्यांची दालने असतील.
या मुख्य इमारतीशेजारीच मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी स्वतंत्र सहा मजली इमारत प्रस्तावित आहे. यासोबतच वाहनतळ, अभ्यागतांसाठी कक्ष, उपहारगृह व सुरक्षा व्यवस्था यांसारख्या आधुनिक सुविधा देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
तसेच, शासकीय मुद्रणालयाची जागा विधिमंडळासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सुमारे चार लाख चौरस फुट जागेत चौदा मजली प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. या दोन्ही प्रमुख इमारतींना एक भुयारी टनेलद्वारे जोडण्यात येणार असून, त्यामुळे सुरक्षित आणि सुलभ दळणवळण शक्य होईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी स्पष्टपणे सांगितले की, “हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेवर आधारित असावा. अभ्यागतांसाठी आरामदायी जागा व आधुनिक उपहारगृहही असावं,” असे निर्देश त्यांनी दिले.
या विस्तारीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळ करणार असून, लवकरच त्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर केला जाणार आहे. नागपूरच्या राजकीय व प्रशासकीय इतिहासात हा प्रकल्प एक नवसंजीवनी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.