नागपूर – शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला चेन स्नॅचिंग प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. चेन स्नॅचिंग विरोधी पथकाने जबरदस्तीने चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीलेले सोनं, दुचाकी आणि मोबाईल जप्त केला आहे. तसेच चोरीचे सोनं खरेदी करणाऱ्या एका सराफालाही अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपीची ओळख-
गिरफ्तार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कन्हैया नारायण बौराशी (वय ४२) असून तो गणपतीनगर, गोधनी रोड, मानकापूर परिसरातील रहिवासी आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून बेरोजगार असून घरखर्च व पत्नीच्या गुजारा भत्त्यासाठी गुन्हे करत असल्याची कबुली त्याने दिली आहे.
५ चेन स्नॅचिंग प्रकरणांची कबुली-
पोलिस चौकशीत कन्हैयाने नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ अशा एकूण ५ चेन स्नॅचिंग प्रकरणांची कबुली दिली आहे.
ही कारवाई २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडलेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणानंतर सुरू झाली. मनीष नगर परिसरातील ७४ वर्षीय जयश्री जयकुमार गाडे आपल्या घराकडे जात असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील सुमारे ८०,००० रूपयांची सोनसाखळी हिसकावली होती. याप्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अटक-
गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कन्हैया बौराशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ग्रे रंगाची होंडा शाइन दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
कन्हैयाने चोरीचा ऐवज साईं ज्वेलर्स, गोधनी रोड, मानकापूर येथील मालक अमरदीप कृष्णराव नखाते (वय ४२) याला विकल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून १०.९४० ग्रॅम सोनं (मूल्य ₹१,८५,५००) हस्तगत केलं आहे.
दोन्ही आरोपींना बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई डीसीपी (गुन्हे) राहुल माकणीकर आणि एसीपी अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मसपोनि मंगला हरडे, पोहवा मनीष बुरडे, संतोष गुप्ता, प्रफुल मानकर, संदीप भोकरे, कुणाल लांगडे आणि संदीप पडोले यांच्या पथकाने केली.