नागपूर : शहरातील महत्त्वाचा धंतोली अंडर ब्रिज पुढील दीड महिना बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अजूनही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. मोक्षधाम घाट चौकाजवळील या पुलावर मध्य रेल्वेच्या वतीने दुरुस्तीचे काम सुरू असून, हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनुसार, पावसाळ्यापूर्वी पुलाची देखभाल आवश्यक आहे, जेणेकरून पावसाच्या वेळी कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवू नये. मात्र या दरम्यान पुल बंद असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी व खोळंब्याचा सामना करावा लागत आहे.
लोहा पुलही अचानक बंद,अधिकाऱ्यांनाही माहिती नाही-
दरम्यान, सोमवारी लोहा पुलालाही एकाच बाजूने अचानक बंद करण्यात आले, ज्यामुळे शहरातील ट्रॅफिक अधिक कोलमडले आहे. या पुलावरही रेल्वेच्या वतीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा पुल का बंद करण्यात आला, याची माहिती खुद्द रेल्वे प्रशासनाकडेही नाही, असे सांगण्यात येत आहे.
शहराच्या वाहतुकीवर मोठा परिणाम-
धंतोली अंडर ब्रिज हा नागपूर शहराच्या दोन भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. नागपूर व अजनी रेल्वे स्थानक तसेच मुंबई मार्गाशी जोडणारा हा पूल सुमारे १०० वर्ष जुना आहे. त्यामुळे त्यामध्ये अनेक दोष निर्माण झाले आहेत. पुलाची दुरुस्ती होणं गरजेचं असलं तरी नागरिकांना पर्यायी मार्गांची सुविधा उपलब्ध न केल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.या भागात एकूण तीन टनेल असून, सध्या दुसऱ्या टनेलचे काम सुरू आहे. त्यासाठी पहिला टनेल बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून दररोज प्रचंड प्रमाणात वाहतूक होते. परिणामी सकाळी १० ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत, व वाहने अक्षरशः रेंगाळत पुढे सरकत आहेत.या संपूर्ण प्रकरणावर मध्य रेल्वे नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल व डीआरएम विनायक गर्ग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र दोघांकडूनही कोणताही प्रतिक्रिया मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.