Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Sep 1st, 2020

  नागपूरी संत्री ; किडीच्या प्रादुर्भावात बुरशीनाशक फवारणीचे आवाहन

  नागपूर : नागपूरी संत्र्यावर फायटोप्थोरा ब्राऊन रॉट या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव दिसून आला आहे. ज्यामुळे नागपूरी संत्रा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विदर्भातील संत्रा उत्पादक पट्टयामध्ये मागील पंधरवाड्यापासून सततधार पाऊस असल्यामुळे (200 मिमी) ओले आणि दमट वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे, जी फायटोप्थोरा बुरशीची वाढ होण्यास पूरक आहे. नागपूरी संत्र्यावर फायटोप्थोरा ब्राऊन रॉट या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव दिसून आल्यामुळे या किडीच्या नियंत्रणाकरीता जून, जुलैच्या दरम्यान किंवा पहिल्या पावसाच्या अगोदर कॉपरयुक्त बुरशीनाशकाची (1 टक्के बोर्डेक्स मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्राम/लिटर) फवारणी केल्यास दमट हंगामात संरक्षण प्रदान करते. पाऊस जास्त पडल्यास ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये वरील बुरशीनाशकाची पुन्हा फवारणी करावी, असे विभागीय कृषी सहसंचालक यांनी कळविले आहे.

  फायटाप्थोरा ब्राऊन रॉट हा एक फळांचा रोग आहे. जो सहसा सतत दमट हवामान आणि पाण्याचा निचरा न होण्याशी संबंधित असतो. पावसाळ्याच्या उत्तरार्धात (मध्य ऑगस्ट ते ऑक्टोबर) जास्त प्रमाणात पाऊस पडल्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव सामान्यत: दिसून येतो. या कालावधीमध्ये इतर कारणांमुळे झालेली फळगळ गोंधाळात टाकणारी असते. या रोगाची लक्षणे प्रामुख्याने सुरवातीला परिपक्व किंवा परिपक्व होण्याच्या स्थितीत असलेल्या फळावरती आढळून येते. सुरुवातीला पाणी शोषण केल्यासारखे घट्ट चमड्यासारखे चट्टे दिसून येतात. परंतु ते लवकर मऊ होतात आणि पिवळट तपकिरी रंगाचे दिसू लागतात व त्यांना झोंबणारा गंध येतो, उच्च आद्रतेमुळे फळांच्या पृष्ठभागावरती बुरशीच्या पांढुरक्या मायसेलियाची वाढ होते आणि संक्रमित फळ अखेरीस खाली पडतात. प्रसंगी फांद्या, पाने आणि मोहोर तपकिरी रंगाचे होऊन मरतात. या रोगाची सर्वात गंभीर बाब म्हणजे फळ तोडणीच्या आधी फळांवरती लक्षणे दिसत नाही. साठवण आणि वाहतुकीच्या दरम्यान संक्रमित फळे निरोगी फळात मिसळल्यास चांगल्या फळांना सुध्दा या रोगाची लागण होऊन रोगाचा प्रसार होतो. हा रोग फायटोप्थोराच्या दोन प्रजातीमुळे होतो. फायटोप्थोरा पाल्मिवोरा आणि फायटोप्थोरा निकोशियानी ज्यामध्ये पाल्मिवोरा ही प्रजाती जास्त आक्रमक आहे कारण या प्रजातीचा प्रसार हवेमार्फत होऊन तो झाडांवरच्या फळांना संक्रमित करतो.

  या ब्राऊन रॉटचे व्यवस्थापन प्रतिबंधावर अवलंबून असते. ज्यामध्ये जमिनीपासून 24 इंच किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवरुन झाडाची छाटणी केल्याने या रोगाचे प्रमाण कमी करता येते. जून, जुलैच्या दरम्यान किंवा पहिल्या पावसाच्या अगोदर कॉपरयुक्त बुरशीनाशकाची (1 टक्के बोर्डेक्स मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्राम/लिटर) फवारणी केल्यास दमट हंगामात संरक्षण प्रदान करते. पाऊस जास्त पडल्यास ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये वरील बुरशीनाशकाची पुन्हा फवारणी करावी. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ अनुसंधान संस्थान (आयसीएआर) नागपूरचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी विदर्भातील संत्रा बागांना रोगाचा गंभीर धोका असल्याने उत्पादकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून रोगाचा गंभीर धोका असल्यास उत्पादकांना संक्रमित फळबागांमध्ये फॉसेटिल अल्युमिनियम किंवा मेफेनोक्झाम एमझेड 2.5 ग्रॅम/लिटर पाण्यात फवारणी करावी तसेच फळ तोडणीच्या वेळी संक्रमित फळे क्रेट/बॉक्समध्ये टाकल्यास जाऊ नये याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145