नागपूर – शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेडीज क्लब चौकात उशिरा रात्री दोन कारांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यात तिघा लहान मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली. अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून एका कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पहिल्या कारमध्ये चालकासह काही प्रवासी होते, मात्र अपघातानंतर चालक जखमी झाला आणि इतर जण मागच्या दरवाजाने पळून गेले.
दुसऱ्या कारमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य आणि लहान मुले प्रवास करत होते. या गाडीतील पाच जण जखमी झाले असून त्यात तिघे लहान मुलांचा समावेश आहे. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, हा चौक तीन पोलिस ठाण्यांच्या सीमारेषेवर असल्याने अधिकार क्षेत्रावरून गोंधळही निर्माण झाला.
शेवटी सदर पोलीस ठाण्याने या प्रकरणी अपघात घडवणाऱ्या कारचालकाविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.