नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या एसएसबी (SSB) पथकाने ऑपरेशन शक्तीअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत एकूण सात महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई मानव तस्करीविरोधी मोहिमेचा एक भाग असून, संबंधित महिलांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
गुन्हे शाखेच्या या कारवाईने नागपुरात सुरू असलेल्या बेकायदेशीर देहविक्री व तस्करीच्या रॅकेटवर मोठा आघात झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.
दरम्यान, मानव तस्करीविरोधी जनजागृतीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पोलीस आयुक्त सरांच्या निर्देशानुसार, सर्व हॉटेल, स्पा, सैलून आणि व्यावसायिक आस्थापनांनी त्यांच्या ठिकाणी मानव तस्करीविरोधी फलक (signage) दृश्यस्थळी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हा फलक त्वरित लावावा आणि संस्थेने आपली मानव तस्करीविरोधातील भूमिका स्पष्टपणे दर्शवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हा संदेश अधिकाधिक आस्थापनांपर्यंत पोहोचवावा, अशी विनंती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.