नागपूर – शहरात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एक धडक कारवाई करत गणेशपेठ परिसरात सुरू असलेल्या देहव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, एक आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दोन संशयित आरोपी फरार आहेत. पोलिसांनी रोख रक्कम व महागड्या मोबाईलसह एकूण ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई १ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा बस स्टँड चौकाजवळील स्वॅग स्टे राहुल हॉटेलच्या समोर करण्यात आली. या ठिकाणी महिलांना लवकर पैसे मिळवून देण्याच्या अमिषाने फसवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. या महिलांना बाहेरच्या राज्यांतून नागपूरमध्ये आणल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सुमित ईश्वर घाटे या तरुणाला अटक केली असून, ‘राहुल’ आणि ‘सचिन’ नावाचे दोन इसम फरार आहेत. या आरोपींविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाचही महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षितस्थळी हलवले असून, पुढील तपासासाठी प्रकरण गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हेगारीच्या विरोधात पोलिसांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असले तरी नागपूरसारख्या शहरात अशा प्रकारचे रॅकेट खुलेआम सुरू असल्याची बाब निश्चितच धक्कादायक आहे. मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अधिक तीव्र आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे. ऑपरेशन शक्तीमुळे आतापर्यंत अनेक महिलांना मुक्त करण्यात यश आले असून, नागपूर पोलीस दलाने या मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप द्यावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.