नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाट लोकवस्तीमध्ये घरातच सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी घरमालकाला अटक करून तीन महिलांची सुटका केली. त्यापैकी एक महिला दिल्ली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण शालीकराम बिलसे (३०), रा. पवननगर, यशोधरानगर हा आपल्या घरात महिलांना देहव्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देत आर्थिक फायदा मिळवत होता. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून एका महिलेशी दोन हजार रुपयांत व्यवहार निश्चित केला. महिला ग्राहकासोबत घरातील खोलीत पोहोचताच पोलिसांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान तीन महिलांची सुटका करण्यात आली.
तपासात आरोपी महिलांचे छायाचित्रे संदेशवहनाच्या माध्यमातून ग्राहकांना पाठवत असल्याचे निष्पन्न झाले. व्यवहार ठरल्यानंतर ग्राहकांना घरापासून काही अंतरावरील चौकात बोलावून आरोपी स्वतःच्या दुचाकीवरून त्यांना घरी घेऊन जात असल्याचेही समोर आले.
सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एकीला देहव्यवसायासाठी दिल्लीहून नागपुरात आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुमारे सहा महिन्यांपूर्वी ती नागपुरात आली होती. सुरुवातीला ती एका हॉटेलमध्ये काम करत होती. त्यानंतर तिची आरोपीसोबत ओळख झाली आणि ती त्याच्या घरात राहू लागली.
या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल संच आणि सुमारे एक लाख रुपये किमतीची दुचाकी असा एकूण १ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यशोधरानगर पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.या कारवाईबाबत सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांनी माहिती दिली.




