नागपूर – रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! मध्य प्रदेश आणि दक्षिण भारताला थेट रेल्वेने जोडणाऱ्या नव्या ग्वाल्हेर – एसएमव्हीटी बंगळुरु एक्स्प्रेस ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला आहे. या नव्या सेवेचा थेट फायदा नागपूरकर प्रवाशांना मिळणार आहे, कारण ही गाडी नागपूर स्थानकावर थांबा घेणार आहे.
गुरुवारी या गाडीचे विधिवत उद्घाटन झाले. नियमित सेवा २९ जूनपासून बंगळुरुहून तर ४ जुलैपासून ग्वाल्हेरहून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, आयटी हब असलेल्या बंगळुरु शहराशी नागपूरकरांना आता थेट आणि आरामदायक रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे.
मार्ग व थांबे-
ही गाडी ग्वाल्हेरहून निघून शिवपुरी, गुना, अशोकनगर, बीना, विदिशा, भोपाळ, बैतूल, नागपूर, सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह मार्गे बंगळुरुपर्यंत धावेल. नागपूर स्थानकावर या गाडीचा ५ मिनिटांचा थांबा असणार आहे.
गाडीची वेळापत्रक आणि नंबर-
गाडी क्रमांक 11085 – बंगळुरु ते ग्वाल्हेर एक्स्प्रेस:
ही गाडी दर रविवार दुपारी ३:५० वाजता बंगळुरुहून रवाना होईल आणि मंगळवारी सकाळी ग्वाल्हेरला पोहोचेल. नागपूर स्थानकावर ही गाडी सोमवारी दुपारी ३:५० वाजता पोहोचेल आणि ३:५५ वाजता पुढे रवाना होईल.
गाडी क्रमांक 11086 – ग्वाल्हेर ते बंगळुरु एक्स्प्रेस:
ही गाडी दर शुक्रवार दुपारी ३ वाजता ग्वाल्हेरहून सुटेल आणि रविवार सकाळी बंगळुरुला पोहोचेल. नागपूर स्थानकावर ती शनिवारी पहाटे ५:५० वाजता पोहोचेल आणि ५:५५ वाजता पुढे रवाना होईल.
प्रवाशांमध्ये उत्साह-
या नव्या ट्रेनमुळे मध्य भारत आणि दक्षिण भारतातील प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होणार असून, नागपूरसह विदर्भातील प्रवाशांसाठी ही सेवा एक उत्तम पर्याय ठरेल. गाडीमध्ये प्रवाशांसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा देण्यात आल्या असून, सुरुवातीलाच या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.