Published On : Wed, Jun 28th, 2017

ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यात नागपूर अग्रेसर राहील : महापौर नंदा जिचकार

Advertisement

Mayor
नागपूर: भविष्यात स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना नागपुरातील ऊर्जा कार्यक्षमता वाढणेही गरजेचे आहे. ऊर्जा बचतीसाठी नव्या तंत्रज्ञानाची नवनवी उपकरणे वापरून ऊर्जा खर्च निम्म्यावर आणण्यात आणि आपारंपरिक ऊर्जा वापरून आदर्श निर्माण करण्यात नागपूर अग्रेसर राहील, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) यांच्या वतीने ‘महानगरपालिका क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा करणे’ (Energy Efficiency Improvement in Municipalities) या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर मनपा आयुक्त अश्विन मुदगल, सिडबीच्या एनर्जी इफिसियन्सी सेंटरचे लीड टेक्निकल एक्स्पर्ट शंकर हलधर आणि ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे विभागीय संचालक जयंत पाठक उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, ऊर्जाबचत आणि ऊर्जानिर्मितीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर ही आता काळाची गरज आहे. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात प्राधान्याने ऊर्जा बचत करणारी नवी उपकरणे लावण्यावर भर आहे. सध्याचे स्ट्रीट लाईट बदलवून ऊर्जा बचत करणारे नवे स्ट्रीट लाईट लावण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. सिडबीने आयोजित केलेली ही कार्यशाळा नागपुरातील ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयुक्त अश्विन मुदगल म्हणाले, नागपुरात ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध प्रयोग सुरू आहेत. नागपुरातील वाहतूक सुद्धा ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने बदलत आहेत. भविष्यात संपूर्ण शहर बस सेवा ही इलेक्ट्रीक तत्त्वावर राहील या दिशेने कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिडबीच्या एनर्जी इफिसियन्सी सेंटरचे लीड टेक्निकल एक्स्पर्ट शंकर हलधर यांनी कार्यशाळेमागील भूमिका विषद केली. ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे विभागीय संचालक जयंत पाठक यांनी स्वागत भाषण केले.

तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्‌घाटन करण्यात आले. उद्‌घाटन कार्यक्रमानंतर वक्त्यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकला. ‘ऊर्जा कार्यक्षमतेसाठी आंशिक जोखीम सामायिकरण सुविधा’ (Partial Sharing Facility for Energy Efficiency) या विषयावर सिडबीचे लीड टेक्निकल एक्स्पर्ट शंकर हलधर यांनी सादरीकरण केले. ‘केस स्टडीसह इस्कोचा ऊर्जा दक्षता व कार्यप्रणाली परिचय‘ (Introduction to Energy Efficiency and Functioning of ESCOs with case studies) या विषयावर एआयआयएलएसजीचे एनर्जी इफिशिएन्सी हेड कनगराज गणेशन यांनी, आयएफसी अनुभव : शेअर्ड सेव्हींग ॲण्ड डिमांड सेव्हींग मॉडेलचे ट्रान्झॅक्शन स्ट्रक्चर’ (IFC Experience : Transaction Structure of the Shared Saving and Deemand Saving Model) या विषयावर आयएफसीचे इन्व्हेस्टमेंट ऑफिसर सुमित शुक्ला यांनी तर ‘नागपूर महानगरपालिकेत ऊर्जा कार्यक्षमतेत व आपारंपरिक ऊर्जास्त्रोताचा वापर करण्यासाठी केलेली उपाययोजना’ (Measures taken for Improvement of Energy Efficiency and Use of Renewable Energy in NMC) या विषयावर नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन एआयआयएलएसजीच्या कार्यक्रम प्रमुख अनुराधा दास यांनी केले. आभार विभागीय संचालक जयंत पाठक यांनी मानले. कार्यक्रमाला विदर्भातील महानगरपालिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.