- महापौर, आयुक्त व सत्तापक्ष नेते यांनी केले संयुक्त निरीक्षण
- पावसामुळे नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा : नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या
नागपूर: पहिल्या पावसात ज्या घरांमध्ये पावसाचे पाणी साचले तेथे यापुढे पाणी साचणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.
मंगळवार २७ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. अनेक ठिकाणी नुकसान झाले. शहरात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल यांनी ज्या भागात सर्वाधिक नुकसान झाले, ज्या भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले त्या भागाचा संयुक्तपणे दौरा केला. यावेळी त्यांच्यासह हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे, नेहरूनगर झोन सभापती रेखा साकोरे, नगरसेविका विशाखा बांते, नगरसेवक मनोज गावंडे, नगरसेविका विशाखा मोहोड, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दिलीप सोनटक्के, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, धंतोली झोनचे सहायक आयुक्त जी.एम. राठोड, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त आर.पी. भिवगडे, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, माजी नगरसेवक शरद बांते आदी उपस्थित होते.
प्रारंभी मा. महापौर, सत्तापक्ष नेते व आयुक्त यांनी नंदनवन, केडीके महाविद्यालयाजवळील राजेंद्र नगर चौकात पाणी साचलेल्या भागाचे निरीक्षण केले. हसनबाग मार्ग, नंतर पोहरा नदी वाहत असलेल्या हुडकेश्वर नाला परिसरातील आदर्श संस्कार व सेंट जॉन पॉल शाळा परिसरातील श्याम नगर येथील शिकस्त पुलाचे निरीक्षण केले. याठिकाणी पूल छोटा असल्यामुळे पाण्याचा प्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. हा पूल शिकस्त झाल्याने नव्याने बांधण्यासंदर्भात तांत्रिक सल्लागाराची मदत घेऊन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मा. महापौर व मा. निगम आयुक्त यांनी मुख्य अभियंता यांना दिले. नंतर मा. निगम आयुक्तांनी रिंग रोड रामेश्वरी भागातील धाडीवाल ले-आऊट येथील परिसराची पाहणी केली. रामेश्वरी, पार्वतीनगर या भागात सीमेंट रोड उंच झाल्यामुळे परिसरातील खोलगट भागात पाणी जमा झाल्याने ते परिसरातील घरात शिरले. या भागाचे त्यांनी निरीक्षण केले असता आयआरडीपी अंतर्गत तयार झालेल्या नाल्यातील गाळ काढून तो उंच करण्यची सूचना दिली.
सुयोगनगर येथील घरांमध्ये पाणी साचण्याचे नेमके कारण त्यांनी जाणून घेतले. पहिल्याच पावसात जर या वस्त्यांमध्ये पाणी शिरले असेल तर भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पावसाचे पाणी नाल्यामध्ये सोडण्याची व्यवस्था सदोष असेल तर ती तातडीने दुरुस्त करा. गडर लाईन स्वच्छ करा, गरज असेल तेथे चेंबर तयार करा, असे निर्देशही त्यांनी दिले. पाऊस पाण्यामुळे कोणतीही वित्त व जीवहानी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही मा. महापौर व आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दौऱ्याप्रसंगी परिसरातील नागरिकांच्याही त्यांनी भेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. महानगरपालिका आपल्या समस्या सोडविण्यासाठी आणि येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सदैव तत्पर आहे याबाबत महापौर आणि आयुक्तांनी नागरिकांना आश्वस्त केले. कुठली समस्या किंवा आपत्ती आल्यास आपल्या प्रभागातील नगरसेवक, झोनचे सहायक आयुक्त यांच्यासह झोन कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
