Published On : Tue, Jul 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पत्नीच्या निर्घृण हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप; विवाहबाह्य संबंधांवरून झाला होता वाद

Advertisement

नागपूर : विवाहबाह्य संबंधांना विरोध केल्याने आणि मोबाईल मागितल्याच्या कारणावरून पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला नागपूर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषीवर ५०० रुपयांचा दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. हा निकाल सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी दिला.

ही घटना पांचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून, परशुराम उर्फ तूफान स्वामिदीन ब्राह्मणे (वय ३३) असे दोषीचे नाव आहे. तो लष्करीबाग परिसरात पत्नी सोनू ब्राह्मणे हिच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होता.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, परशुरामचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. १६ सप्टेंबर २०२२ रोजी सोनूने मेयो रुग्णालयात पतीला एका महिलेसोबत पाहिल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता.

दुसऱ्या दिवशी, १७ सप्टेंबरच्या रात्री जेवणानंतर दोघेही त्यांच्या खोलीत गेले. त्यावेळी सोनूने पुन्हा विवाहबाह्य संबंधांबाबत जाब विचारत पतीचा मोबाईल मागितला. याचाच राग मनात धरून परशुरामने टीव्हीजवळ ठेवलेले लाकडी टेबल उचलून पत्नीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वारंवार प्रहार केले. या भीषण हल्ल्यात सोनूचे अनेक दात तुटले आणि अतिरक्तस्रावामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मेंढे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोसे यांनी केला. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील आसावरी परसोडकर यांनी मृत महिलेच्या मुलीसह इतर साक्षीदारांचे जबाब, तसेच वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर सादर केले.

सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरत नागपूर सत्र न्यायालयाने परशुराम ब्राह्मणे याला पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.