नागपूर : वानाडोंगरी येथील पायल कॅफेचे संचालक मनीष गिरी यांनी वाहतूक पोलिस कर्मचारी मनीष भोसले यांच्यावर मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत गिरी यांनी संपूर्ण घटनेची माहिती देत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
मनीष गिरी यांनी सांगितले की, १३ जून रोजी कॅफेसमोर माहिती फलक (साइन बोर्ड) लावण्याच्या कारणावरून वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यासोबत वाद झाला. या वादादरम्यान संबंधित कर्मचाऱ्याने त्यांच्याशी मारहाण करत शिवीगाळ केली, असा आरोप त्यांनी केला. या कथित मारहाणीत दोन्ही कानांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११७(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविल्याची माहिती गिरी यांनी दिली.
घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात यावे, जेणेकरून संपूर्ण घटनेचे सत्य समोर येईल, अशी मागणीही त्यांनी केली. कोणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
याशिवाय, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले.




