राज्यात हवामानात घडणारे वेगवान बदल चिंतेचा विषय ठरत आहेत. येत्या २ मे रोजी विदर्भात वातावरण अधिकच अस्थिर राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही भागांत उन्हाचा चटका कायम राहणार असला तरी काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजांचा गडगडाट आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अकोल्यात ४४ अंश तर अमरावतीत ४३ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवल्याने उष्णतेची तीव्रता जास्त जाणवू शकते.
नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमान ४१ ते ४३ अंशांच्या दरम्यान राहील. तर गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान सुमारे ३७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती आणि बुलढाणा येथे दुपारी उष्णतेचा त्रास अधिक जाणवेल. मात्र, दुपारनंतर आकाश काहीसे ढगाळ होण्याची शक्यता आहे.
नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळू शकतात. नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.